मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोडच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे उदरनिर्वाह, आसऱ्यासाठी सिग्नलजवळ राहणाऱ्या मुलांसाठी सिग्नल शाळा सुरु करण्यात येणार आहे. या सिग्नल शाळेद्वारे पालिका १०० मुलांच्या शिक्षणांची व्यवस्था करणार आहे.
या शाळेत मुलांसाठी अत्यावश्यक साधनसामुग्री,प्रयोगशाळा, कम्प्युटर,प्रिंटर इत्यादी सोयीसुविधा असतील. स्थलांतरित आणि बेघर कुटुंबीय आणि त्यांची मुले सिग्नलजवळ उदरनिर्वाहासाठी राहत असतात. त्यामुळे अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पालिका सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडच्या उड्डाणपुलाखाली दहा कंटेनरमध्ये ही शाळा सुरु करण्याच्या तयारीत आहे.
या शाळेसाठी दोन ते सव्वादोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यामातून हा खर्च केला जाणार आहे. सिग्नल शाळेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याच्या आराखड्यानंतरही निविदा प्रक्रियाही राबवण्यात येणार आहे.