मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर कायमच चर्चेचा भाग असतात. याशिवाय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी ते सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. पण आता त्यांची सोशल मिडियावर व्यक्त होण्याची पंचायत झाली असून त्यांचं एक्स अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. मुळात जावेद यांनी स्वत:च त्यांचं सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.
भारतीय ऑलिम्पिक संघाबद्दलची एक पोस्ट रविवारी म्हणजेच २८ जुलै रोजी माझ्या अकाऊंटवरून करण्यात आली होती. पण ती मी केलेली नाही. असा दावा अख्तर यांनी केला. एक्सवर पोस्ट शेअर करत जावेद अख्तर म्हणाले की, "माझं एक्स अकाऊंट हॅक करण्यात आले होते. पॅरिसमध्ये चालू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ संबंधित भारतीय संघाबद्दल माझ्या अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ती पोस्ट मी केलेली नसून हॅकरने केलेली होती." दरम्यान, संबंधित घटनेची तक्रार जावेद अख्तर यांनी एक्सच्या अधिकाऱ्यांकडे केली असून त्याचा तपास सुरु आहे.