मुंबई : दोन महिने कमाईविना बैठे असलेले मच्छीमार बांधव दि. 1 ऑगस्ट रोजीपासून समुद्रात होड्या लोटण्याच्या तयारीत आहेत. होड्यांच्या डागडुजीसह अन्य बारिकसारिक कामे पूर्ण करण्याच्या कामी समुद्रकिनार्यावर मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. परंतु, समुद्रात वादळी वार्याचा अडसर असल्याने कोळी बांधव चिंतेत सापडले आहेत. गेले दोन महिने बंद असलेल्या मासेमारीच्या महत्त्वाच्या पहिल्या हंगामात होड्या समुद्रात लोटण्यासाठी मच्छीमार बांधव उत्सुक झाले आहेत.
यासाठी किनार्यावर बोटींची दुरुस्ती आणि इतर कामी लगबग सुरू झाली आहे. उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या मासेमारीच्या व्यवसायात वर्षभर मच्छीमार गुंतून गेलेला असतो. मात्र, पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मासेमारीचा हंगाम सुरू होण्याच्या आशेने मच्छीमार बांधवांची तयारी दिसून येते आहे. समुद्रात मासेमारीसाठी समुद्राला शांत होण्याच्या विनंतीसाठी समुद्राची पूजाअर्चा केली जाते. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला आहे. परंतु, यावर्षी जुलै महिना संपत आला, तरी पाऊस-वारा थांबत नसल्याने सध्या कोळी बांधव चिंतेत सापडले आहेत.
डागडुजीची कामे अंतिम टप्प्यात
गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून आता थोडी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. तसेच, मुहूर्त काढून पूजाअर्चा करून होड्या समुद्रात सोडल्या जातात. खवळलेला समुद्र असल्याने किती नौका निघतील, याचे अनुमान तूर्तास कठीण. मासेमारीची पूर्वतयारी म्हणून जाळी भरणे, खलाशांची जमवाजमव, डिझेल, बर्फ, अन्नधान्य आदी तयारी सुरू झाली आहे. समुद्रकिनारी जाळी विणणे, होड्यांना तेल-पाणी, डागडुजी, रंग लावणे, बोर्ड रंगवणे ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.