मुंबई : मुंबई महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई सुरु आहे. त्यातच रस्ते, पदपथावरील फेरीवाल्यांचे बस्तान हटवल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने दिल्लीतील कॅनॉट प्लेसप्रमाणे 'भूमिगत पालिका बाजारा'ची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
अंधेरी पश्चिमेकडील आंब्रे उद्यानसह मुंबई महापालिका दादरमधील कोतवाल उद्यान आणि दादर टीटीजवळ हा भूमिगत बाजार सुरु करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पालिकेकडून व्यवहार्यता तपासली जात आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक केंद्र असून या भागात ३९८ दुकानांमध्ये भूमिगत बाजार भरतो.
या बाजारात एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वस्तुंची खरेदी ग्राहकांना करता येते. त्यामुळे मुंबईही जागेअभावी लोकांना होणार त्रास लक्षात घेता, पालिकेने भूमिगत बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली असून, पुढील मंजूरी प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती आहे. या बाजारामुळे दादर भागात फुले, भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची ही गैरसोय होणार नाही.