अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणार्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेचे उद्घाटन झालेच. फ्रान्समधील तणावग्रस्त परिस्थितीचे पडसाद या स्पर्धांवर उमटत असतात. या सगळ्याकडे दुर्लक्ष करत मात्र देशवासीयांच्या आशीर्वादासह स्पर्धेला गेलेल्या भारतीय संघाने या स्पर्धेत सकारात्मक सुरुवात केली आहे. स्पर्धेतील भारतीय संघाच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसच्या ’सीन’ नदीकिनारी, दि. 26 जुलै ते दि. 11 ऑगस्ट दरम्यानच्या ‘पॅरिस ऑलिम्पिक 2024’ स्पर्धांचा तो अद्भुत सीन अर्थात उद्घाटनाचा सोहळा समस्त क्रीडारसिकांनी अनुभवला. फ्रान्समध्ये शुक्रवार, दि. 26 जुलैच्या रात्री झालेल्या भव्य सोहळ्यात, 2024 सालच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सोहळा सुरू झाला, तेव्हा पॅरिसमध्येही मुसळधार पाऊस सुरू झाला होता. तरीही या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची दुर्मीळ पर्वणी चुकू नये, म्हणून प्रेक्षक भर पावसात बसून होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा केली. ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासात यावेळी प्रथमच, उद्घाटन सोहळा मुख्य मैदानाच्या बाहेर नदीतीरावर पार पडला. त्यामुळे देशोदेशीच्या खेळाडूंच्या पथकांनी नेहमीच्या प्रथेपेक्षा वेगळ्या पद्धतीने संचलन केले. जवळपास सात हजार खेळाडूंनी सीन नदीतून बोटीतून येऊन, उपस्थितांना अभिवादन केले. ज्युदोमध्ये तीनवेळा विजेता ठरलेला टेडी रायनर याने, ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. भारताच्या पथकाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधू आणि शरत कमल यांनी केले. या दिमाखदार सोहळ्यात फ्रान्समधल्या ख्यातनाम कलाकारांनी नृत्य, गीतांचे सादरीकरण केले. प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लेडी गागा हिनेही, उपस्थितांना आपल्या गाण्यावर ताल धरायला लावला. संचलनाची सांगता, 2028 आणि 2032 सालच्या ऑलम्पिक स्पर्धेचे यजमानपद असलेल्या, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या पथकांनी केली. यावेळच्या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक पदकविजेत्या खेळाडूला पदकासोबत प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या उभारणीसाठी वापरलेल्या मूळ लोखंडाचा तुकडा देऊन गौरवले जाणार आहे.
हा औपचारिक उद्घाटन सोहळा जरी शुक्रवार, 26 तारखेला पार पडला असला तरी, त्याआधीचे काही दिवस पॅरिसमध्ये काही घडामोडी घडत होत्या. ऑलिम्पिक भरवणार्या जागतिक ऑलिम्पिक कार्यकारिणीची बैठक बुधवार, दि. 24 जुलै रोजी भरली होती. समितीच्या सदस्यपदी रिलायन्स उद्योग समूहाच्या क्रीडाप्रेमी नीता अंबानी यांची एकमताने फेरनिवड या बैठकीत झाल्याने, भारताच्यादृष्टीने त्या बैठकीला महत्त्व होते.स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरपासूनच विविध देशांचे संघ, पॅरिसमध्ये आले होते. ऑस्ट्रेलियाच्या वॉटर पोलोचा संघही पॅरिसमध्ये दाखल झाला होता. तेथील शारीरिक तपासणीत, ऑस्ट्रेलियाच्या वॉटर पोलो संघापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्या खेळाडूचे लगेचच विलगीकरणही करण्यात आले होते. कोरोनाचा हा आजार पसरू नये, म्हणून तेथील सगळी यंत्रणा काळजी घेत असून, फ्रान्सचे आरोग्यमंत्री त्याकडे जातीने लक्ष ठेवून आहेत. ऑलिम्पिक 2024चे यजमानपद भूषवत असणार्या फ्रान्स सरकारने, रशिया आणि बेलारुस यांच्या संघाला निमंत्रित केलेले नाही.
बुधवार, दि. 24 जुलैच्या सकाळपासून फुटबॉल, हॅण्डबॉल, रग्बी सेव्हनस् या भारताव्यतिरिक्त देशांचा सहभाग असणार्या क्रीडाप्रकारांनी, ऑलिम्पिकच्या स्पर्धांची सुरुवात झाली. प्रारंभिक फुटबॉल स्पर्धेत थोडेसे गालबोट लागल्यासारखे झाले. साखळी सामन्यातील अर्जेंटिना-मोरोक्को यांच्यातील 2-2 अशी बरोबरी झालेल्या सामन्यात, 15 मिनिटांच्या वाढीव वेळेनंतर 16व्या मिनिटाला केलेला गोल पंचांनी वैध ठरवल्यामुळे, चिडलेल्या मोरोक्को समर्थकांनी हुल्लडबाजी करत थोडा तणाव उत्पन्न केला होता. शेवटी मोरोक्कोला 2-1 असे विजयी घोषित करण्यात आले. बुधवारनंतर भारतासाठी प्रत्यक्ष स्पर्धा दि. 25 जुलैच्या गुरुवारी धनुर्विद्येने चालू झाल्या. भारतीय महिला तीरंदाजांनी सुरुवातीलाच ‘अंतिम आठ’ फेरीत प्रवेश केल्यानंतर, मुलांनीही तशीच मोलाची कामगिरी करत, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून पदकाची आशा उत्पन्न केली. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केवळ एक खेळाडू ते 300-400चे पथक असलेल्या देशांचे संचलन झाले. त्या उद्घाटन सोहळ्यातीले भारतीय पथकातील 70 युवक आणि 47 युवती यांची धावपळ पॅरिसमध्ये 69 क्रीडाप्रकारांमध्ये 95 पदकांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. ऑलिम्पिक ज्योत पॅरिसमध्ये आणण्याचा सन्मान भारताचा पहिला वहिला वैयक्तिक सुवर्णपदकविजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला मिळाला.
त्यानंतर बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, नौकानयन, नेमबाजी, टेनिस, टेबल टेनिस आणि हॉकी अशा सात क्रीडाप्रकारात भारतीय स्पर्धक मैदानात उतरलेले आपण पाहिले. तसेच, हॉकीचे धावते वर्णनदेखील रात्री 9 वाजता आपल्याला ऐकायला मिळणार आहे. भारताच्या 2024 ऑलिम्पिकचा प्रारंभ दीपिकाच्या धनुर्विद्येने होत आहे. त्याच दरम्यान, अन्य क्रीडाप्रकारांतही महिला व पुरुष भारतासाठी आपले कसब पणाला लावत आहेत. आज जरी ऑलिम्पिक क्रीडाप्रकार नसला, तरी लवकरच प्रवेश करणारा लोकप्रिय क्रीडाप्रकार म्हणजे क्रिकेट. ऑलिम्पिकमध्ये आज पुरुषांच्या जोडीने, महिलादेखील भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत. अशा आपल्या भारतीय महिला त्या क्रिकेटमध्येही उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. आज ना उद्या पुरुषांच्या जोडीने, महिलाही ऑलिम्पिक क्रीडागारात आपण बघणार आहोत. त्यावरून मला येथे विद्यमान कप्तान पंजाबी क्रीडापटूंची प्रकर्षाने आठवण येते. पंजाबचे हरमनप्रीत नावाचे दोन क्रीडापटू जागतिक स्पर्धांमध्ये भारतासाठी सध्या खेळत असून, ते आपापल्या क्रीडाप्रकारात कप्तानपद सांभाळत आहेत. त्यांपैकी एक क्रिकेटमध्ये, तर दुसरा हॉकीत. श्रीलंकेत डंबोला येथे दि. 19 जुलै ते दि. 28 जुलै यादरम्यान संपन्न झालेल्या, महिलांच्या आशियाई चषक क्रिकेट टी-ट्वेंटी 2024च्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व सांभाळणारी, ‘सी बॉल, हिट बॉल’ घोषवाक्य असलेली कप्तान हरमनप्रीत कौर ही पंजाबी, तर दुसरा ’पंजाबी पुत्तर’ पंजाब सशस्त्र पोलीस दलाचा भारतीय हॉकी संघाचा अनुभवी रक्षक व ‘ड्रॅग-फ्लिकर’ कप्तान हरमनप्रीत सिंग.
मागच्या महिन्यामध्ये क्रिकेट विश्वचषकाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, ते आता ऑलिम्पिककडे वळलेले दिसत आहे. टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाला, ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ने तब्बल 125 कोटी रुपये देऊ केले होते. त्याच ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’चे सचिव जय शाह यांनी, दि. 21 जुलै रोजी ऑलिम्पिक स्पर्धेला जाणार्या भारतीय संघासाठी साडे आठ कोटी रुपये भारतीय ऑलिम्पिक समितीकडे सोपवण्याची घोषणा केली आहे.
नरेंद्र मोदी सरकारच्या ऑलिम्पिकपूर्व कालखंडापासून भारतीय क्रीडापटूंना ”अब की बार सौ पार”ची साद घालण्यात येत आहे. ऑलिम्पिकच्या आधी झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये, आपल्या क्रीडापटूंनी तशी कामगिरी करून दाखवली देखील. आजतागायत कधीही न पटकावलेली दोन अंकी पदके, पॅरिसमधील स्पर्धांमधून घरी आणावीत अशी आशा आता आपण बाळगायला काहीच हारकत नाही. नीरज चोप्रासह अॅथलेटिक्सपटू, पी. व्ही. सिंधू, रंकीरेड्डी व चिराग शेट्टी, हॉकीसंघ, नेमबाजी, कुस्ती, मुष्टियुद्ध यांच्याकडून पदकांची आपण आशा बाळगून आहोतच. आपल्या तिरंदाजांनी आजपर्यंत ऑलिम्पिक पदक आणलेले नाही. टेबल टेनिसपटूदेखील आपल्याला पदक देऊ शकतात. भारतीय संघाने उज्ज्वल कामगिरीसाठी दिवस-रात्र एक करत, कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे दशकी आकडा गाठणे शक्य होऊ शकते. शनिवार, दि. 27 जुलैला नेमबाजीच्या एअर रायफल प्रकारातील मिश्र सांघिक गटात पदकाची फेरी पार पडली. यंदाच्या ऑलिम्पिकमधील अखेरचे पदक हे महिला बास्केटबॉल मध्ये, रविवार, दि. 11 ऑगस्टला दिले जाणार आहे. तेव्हापर्यंत आपले खेळाडू पदके लुटू शकतात. बघू किती आणतात ते...
ऑलिम्पिक म्हटले की, आतंकवादी संघटना विशेष कार्यरत होताना दिसतात. त्या अतिरेक्यांना जणू अंगातच येते. त्याच्यावर उतारा म्हणून ऑलिम्पिकसाठी पॅरिस शहरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त आहे. अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली आहे. हजारो पोलीस आणि सुरक्षा अधिकारी तैनात आहेत. याचा फायदा घेऊन पॅरिस शहराच्या दूरवर तोडफोड आणि जाळपोळीचे प्रकार करण्यात आले. या हल्लेखोरांनी ट्रेनच्या सिग्नलयंत्रणेची तोडफोड केली. पॅरिस शहराच्या पश्चिम, उत्तर भागाकडे जाणार्या रेल्वे लाईन्सही खराब करण्याचा प्रयत्न केला. पॅरिस-मार्सेलया लाईनवरही हल्ल्याचा प्रयत्न, तेथे असलेल्या पोलिसांनी उधळून लावला. रेल्वे लाईन्सवर आणि सिग्नलयंत्रणेवर केलेल्या या हल्ल्यामुळे, हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले. परिणामी, प्रत्येक स्थानावर अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणी स्वीकारलेली नाही; परंतु कट्टर डावे अतिरेकी किंवा पर्यावरण कार्यकर्त्यांपैकी कोणाचातरी हात असल्याचा संशय आहे. कोणाचाही हात असला, तरी हे गुन्हेगारी कृत्य आहे, असे मत फ्रान्सचे परिवहनमंत्री पॅट्रिस व्हेरग्रीएट यांनी व्यक्त केले. स्पर्धेतील सामने आठ वेगवेगळ्या स्टेडियममध्ये होत आहेत. त्यातील अमेरिका बास्केटबॉल संघ पॅरिसमध्ये निवासासाठी आहे, परंतु, बास्केटबॉलचे सामने पॅरिस शहराच्या उत्तर भागातील स्टेडियममध्ये असल्यामुळे, त्यांना या रेल्वेतून प्रवास करायचा होता. या घटनेनंतर आता प्रत्येक स्थानकाची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
ही घटना ऐकल्यावर म्युनिच ऑलिम्पिकची आठवण येते. त्या स्मृतिप्रीत्यर्थ काही आयोजन करण्यात यावे, असे काहींच्या डोक्यात आले. ती म्युनिच ऑलिम्पिकची घटना आता प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये, म्युनिच हत्याकांडाची आठवण म्हणून काढली जाते. पश्चिम जर्मनीच्या म्युनिचमधे आयोजित 1972 सालच्या ऑलिम्पिकमध्ये, इस्रायलच्या ऑलिम्पिक चमुचे 11 सदस्य बंधक बनवले होते व शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. त्या 1972 म्युनिक ऑलिम्पिक दहशतवादी हल्ल्यातील बळींचा स्मरण समारंभ, या पॅरिस गेम्समध्ये ऑलिम्पिक व्हिलेजच्या बाहेर गुप्त ठिकाणी आयोजित केला जाईल, असे नुकतेच सांगण्यात आले आहे. हा समारंभ मूळतः पॅरिस सिटी हॉलमध्ये दि. 24 जुलै रोजी नियोजित होता. परंतु, सेमेटिक आणि इस्रायलविरोधी भावना वाढल्याने, अतिरेकी या कार्यक्रमाला लक्ष्य करू शकतात या चिंतेमुळे तो पुढे ढकलण्यात आला. हत्याकांडानंतर 49 वर्षांनी टोकियो ऑलिम्पिकने प्रथमच उद्घाटन समारंभात, मारल्या गेलेल्या खेळाडूंना मानवंदना देऊ केली होती. त्यानंतर एका वर्षाने जर्मनीमध्ये हल्ल्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याचा समारंभ झाला होता, ज्यामध्ये बर्लिनने प्रथमच अॅथलिट्सच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपयशाची जबाबदारी मान्य केली होती. ‘पॅरिस ऑलिम्पिक प्रतिनिधी मंडळा’च्या वेळापत्रकात, हा कार्यक्रम बसवणे अवघड होते. म्हणून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या समन्वयाने, हा समारंभ आता दि. 6 ऑगस्ट रोजी अन्य ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थॉमस बाक यांच्याबरोबर पॅरिसचे महापौर, इस्रायली शिष्टमंडळ, फ्रान्समधील यहुदी धार्मिक नेते, अशी निवडक मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पॅरिस पोलीस दल सध्या ऑलिम्पिकमध्ये व्यस्त असल्याने, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडू नये याची काळजी घेतली जात असल्याचे सांगताना पॅरिस पोलीस कमिशनर पुढे सांगतात की, ‘इस्लामी दहशतवाद’ ही एक डोकेदुखी पोलीस यंत्रणेला आणि आयोजकांना सतत लागलेली असते.
आतंकवाद, युद्ध, प्रदर्शने असे सतत कुठे ना कुठेतरी चालूच असले, तरी प्रत्येक ऑलिम्पिकचे आयोजक ते ऑलिम्पिक यशस्वी करत आले आहेत. विरोधी घटकांच्या तुलनेत, ऑलिम्पिक यशस्वी करणार्यांची शक्ती अधिक दिसून येत असते. पॅरिसमध्येही तसेच सकारात्मक चित्र दिसून येत आहे. पॅरिस ऑलिम्पिकचे यजमान आणि त्या स्पर्धांमध्ये मनापासून सहभागी होणारे हजारोंच्या संख्येत आलेले क्रीडापटू, या सगळ्यांना आपण क्रीडाप्रेमी मनापासून शुभेच्छा देऊ. भारतीयांचा चमू पॅरिसला रिकाम्या हाताने जरी गेलेला असला, तरी त्यांच्याजवळ भारतीय जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे येताना पदकांचे दशक हाती घेऊनच ते परतीचा प्रवास करोत, ही आपण आशा बाळगून उरलेले सामने बघत ऑलिम्पिकच्या आनंदाची देवाणघेवाण करूया. खेळाडूंनी पॅरिसहून आणलेल्या पदकांतील आयफेल टॉवरचे लोखंडाबरोबर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसकट चावण्याच्या चवीचा तो आनंद घेणारे आपले भारतीय ऑलिम्पिकपटू पाहूया.
श्रीपाद मुरलीधर पेंडसे
9422031704
माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू. पुणे.