जरांगे, शाम मानव यांचा बोलवता धनी दुसराच!

नारायण राणेंचा हल्लाबोल; भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी

    27-Jul-2024
Total Views |

Narayan rane
 
मुंबई : “मनोज जरांगे पाटील, अनिल देशमुख किंवा शाम मानव यांचा बोलवता धनी दुसराच आहे. कोणत्याही भाजप नेत्याला टार्गेट करण्याची कुवत त्यांच्यात नाही,” असा हल्लाबोल भाजप नेते खा. नारायण राणे यांनी शुक्रवार, दि. 26 जुलै रोजी केला.
त्याचप्रमाणे, “देवेंद्र फडणवीस यांच्यामागे भाजप पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. ते एकाकी नाहीत,” असेही त्यांनी सांगितले. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
जरांगे, शाम मानव, अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत आहेत का, या प्रश्नावर राणे म्हणाले की, “जे कोणी त्यांच्यावर टीका करीत आहेत, त्यांचा बोलवता धनी दुसरा कोणीतरी  आहे. जरांगे यांचे नाव मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हते. जरांगे जे काही बोलत आहेत, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, मराठा समाजाचे नाही. जरांगे यांच्यामागे कोणीतरी दुसरे ताकद लावत आहे,” याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
केंद्रीय अर्थसंकल्पावर उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना नारायण राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांच्या काळातले बजेट माझ्याकडे आहे. यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 4 लाख, 50 हजार कोटींचा आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात वित्तीय तूट आणि राजकोषीय तूट मोठी होती. त्यामुळे त्यांनी शिव्या देण्यासाठी नवे व्यासपीठ शोधावे. देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नाही म्हणालेत, उद्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कलानगर दिसत नाही म्हणतील. ठाकरेंच्या हातात टीका करण्यापलीकडे काही उरलेले नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
 
“हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे. तो सर्वसमावेशक आहे. प्रत्येक योजनेतून महाराष्ट्राला पैसे मिळाले आहेत. उद्धव ठाकरे यांना बजेट वाचायचे असेल, तर मी टिपण देईन. अज्ञानी राहुल गांधी बजेटवर बोलले. आम्ही बजेट मांडून लोकांना लाभ दिला. तुम्ही तर राजकोषीय तूट वाढवून दाखवली. आम्ही दहाव्या क्रमांकावरील भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. लवकरच ती तिसर्‍या स्थानावर झेप घेईल,” असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
 
भाजपने २८८ जागा लढवाव्या
विधानसभेत भाजपने किती जागा लढवाव्या, यावर “वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. परंतु, मला असे वाटते की, भाजपने 288 जागा लढवायला हव्या,” असे स्पष्ट मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. राज ठाकरेंनी दिलेल्या स्वबळाच्या नार्‍याबाबत विचारले असता, “मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो,” अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.