ठाणे : ठाण्यात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी पहाटेपासून चांगलेच धुमशान कांडले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव तुडुंब भरले असून जागोजागी पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्षांची पडझड होऊन दोघेजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. यातील वृद्ध शशिकांत कर्णिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
हे वाचलंत का? - बच्चू कडू जरांगेंसोबत तिसऱ्या आघाडीत लढणार? काय म्हणाले? वाचा सविस्तर...
संततधार पावसाची चिन्हे पाहून तसेच हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारच्या दुपारच्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे स्थानकात मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बरची उपनगरी वाहतूक विलंबाने सुरू होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी व्हीसीद्वारे परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या. दरम्यान, बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८:३० या कालावधीत १८८ मि. मीटर पावसाची नोंद तर गुरुवारी दुपारी १ वाजेपर्यंत ६२ मि. मीटर पाऊस पडल्याचे ठाणे मनपा आपतकालीन कक्षातून सांगण्यात आले आहे.