प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारले जाणारे शिवप्रताप स्मारक हा आमचा अभिमान - कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा
अफजल खान वधाचा पुतळा साकारणारे शिल्पकार दीपक थोपटे यांचा, कॅबिनेट मंत्री लोढा यांच्या हस्ते सत्कार
25-Jul-2024
Total Views |
मुंबई : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पर्यटनमंत्री असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक बनवण्यसाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली होती. काही दिवसांपूर्वीच या शिवप्रताप स्मारकात उभारण्यात येणारा अफजल खान वधाचा भव्य पुतळा तयार झाला आहे. मंत्री लोढा यांनी सदर पुतळा घडवणारे शिल्पकार दीपक थोपटे यांचा मंत्रालयात सत्कार (२४ जुलै रोजी) केला. या पुतळ्याचे लवकरच अनावरण करण्यात येईल, असे यावेळी मंत्री लोढा यांनी सांगितले.
प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त मी प्रतापगडावर गेलो होतो, त्यावेळी याठिकाणी कायमस्वरूपी स्मारक उभारण्याची संकल्पना माझ्या मनात आली. जे जे स्कुलच्या सहकार्याने त्यासाठी योजना आखली आणि निविदा देखील काढण्यात आली. शिवस्मारक ज्या ठिकाणी उभारण्याचे ठरले, त्या ठिकाणी जमिनीचे बळकटीकरण, सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधा निर्माण करणे, यासाठी निधी देण्यात आला.
दीड वर्षांपूर्वी हा विषय माझ्या हाती आला त्यावर काम जोमाने सुरु आहे. शिवस्मारक निर्माण करणे हा निवडणुकीचा विषय नसून, आस्थेचा विषय आहे आणि त्याचा कोणी विरोध करू शकत नाही. हे शिवप्रताप स्मारक आमचा अभिमान आहे, आपला गौरवशाली इतिहास आहे. शिवरायांचा पराक्रम पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. माझी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी, हा पुतळा घडवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार मानतो.
सदर शिवस्मारक पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील. उगाच टीका न करता, सर्वांनी त्याचे कौतुक केले पाहिजे. सदर पुतळ्याचे अनावरण हे वादाचे कारण नसून, अतिशय आनंदाचा क्षण आहे. ज्यात सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे!" अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा बनवण्यासाठी जे जे स्कुल ऑफ आर्टस् च्या माध्यमातून निविदा काढण्यात आली. त्याद्वारे दीपक थोपटे यांची निवड झाली.
दीपक थोपटे यांच्यासह १५ जणांची टीम मागील ९ महिने पुतळा घडवण्यासाठी कार्यरत होती. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची १३ फूट आणि अफजल खानाची उंची १५ फूट असलेल्या या पुतळ्याचे वजन ७ ते ८ टन असणार आहे. हा पुतळा प्रतापगड येथे तयार होणाऱ्या शिवस्मारकात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतापगडावर संरक्षक भिंतीचे बांधकाम, रस्त्याचा विकास, लँडस्केपिंग आणि सौंदर्यीकरणाची विविध कामे करण्यात आली आहेत. या पुतळ्यासह अँफीथियेटर आणि लाईट अँड साउंड शो निर्माण होणार आहे. यठिकाणी नागरिकांसाठी टॉयलेट ब्लॉक आणि पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.