चेन्नई : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माघार घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होणार हे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या आजोबांचे गाव असलेल्या तामिळनाडूतील थुलसेंद्रपुरम या गावात त्यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ पोस्टर झळकली आहेत.
कमला हॅरिसचे आजोबा पीव्ही गोपालन हे याच गावचे रहिवासी होते. गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिराबाहेर कमला हॅरिसचे चित्र असलेला बॅनर आहे. बायडन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर गावातील मंदिरात कॅमला हॅरिस यांच्या विजयासाठी पूजा सुरू झाली आहे. ही पूजा अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या ५९ वर्षांच्या आहेत. त्याचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला होता, पण त्यांच्या आईसोबत त्या अनेकदा भारत भेटीवर आल्या आहेत. कमला हॅरिस यांच्या आईचे नाव श्यामला गोपालन आहे. श्यामला एक स्तन कर्करोग संशोधक आहे. त्या तामिळनाडूहून अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. कमला हॅरिस यांचे वडील डोनाल्ड जे. हॅरिस मूळचे जमैकन-अमेरिकन आहेत.