"दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार झाले, तेथे आदित्य ठाकरे होता का?, उत्तर द्या!"
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी उत्तर द्यावे; नितेश राणे यांचे आव्हान
24-Jul-2024
Total Views |
मुंबई : "दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार झाले, तेथे आदित्य ठाकरे होता का? आदित्यच्या निकटवर्तीयांनी तिला बाल्कनीतून ढकलले का? आदित्य ठाकरे आणि दिशा सालियनच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन ८ तारखेला एकच होते का?, याची खरी उत्तरे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी द्यावीत. दिशा सालियनच्या जागी तुमच्या घरातील मुलगी असती, तर अशी लपवालपवी केली असती का? अशा प्रश्नांची सरबत्ती भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवार, दि. २४ जुलै रोजी केली. नरिमन पॉइंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. अनिल देशमुखांवर ईडीच्या प्रकरणातून सुटण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याचा दबाव आणण्यात आला, असा दावा श्याम मानव यांनी केला होता. याबद्दल विचारले असता, राणे म्हणाले, "अनिल देशमुख तुमच्यासमोर जो कुणी अधिकारी आला, त्याने तुम्हाला खरे बोलायला सांगितले. दिशा सालियानसोबत जे झाले, ते सत्य तुम्ही सांगावे असे तुम्हाला सांगण्यात आले होते. पण त्यावेळी तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मुलाला लपवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न केले", असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.
केंद्रातील एनडीए सरकारच्या विकसित भारताची पायाभरणी करणाऱ्या अर्थसंकल्पाचे देशाच्या कानाकोपऱ्यातून कौतुक होत असताना, अर्थसंकल्पाबाबत काहीही माहिती नसणारा एक ढ विद्यार्थी संजय राऊत सारख्याने अर्थसंकल्पाबाबत ज्ञान पाजळावे हे हास्यास्पद आहे, अशी जोरदार टीकाही राणे यांनी केली. अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण विवेचनावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेताना राणे यांनी उद्धव ठाकरे, राऊत यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अर्थसंकल्पावरील चर्चेला येण्याचे खुले आव्हान दिले.
हिम्मत असेल तर फडणवीसांशी खुली चर्चा करा!
- संजय राऊत यांचा मालक उद्धव ठाकरे यांनी स्वत:च जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्याला अर्थसंकल्पातील काही कळत नाही याची कबुली दिली होती. असे मालक अर्थसंकल्पावर टीका करतात आणि याच मालकाचा कामगार असलेले राऊत हेही अर्थसंकल्पावर बोलून आपले ज्ञान पाजळत आहेत. या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुल्या चर्चेचे मी दिलेले आव्हान हिंमत असेल स्वीकारावे, असे नितेश राणे यांनी नमूद केले.
- अर्थसंकल्पातील बारकाव्यांची उत्तम जाण फडणवीस यांना असून त्यांनी अभ्यासपूर्वक ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ ही पुस्तिका लिहीली होती. ही पुस्तिका राऊत यांना पाठवतो त्यांनी याचा अभ्यास करावा म्हणजे त्यांना फडणवीस यांची कुवत, समजआणि ताकद कळेल, अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली.