ठाणे :ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीला ३० वर्षे झाली असुन इमारत धोकादायक बनली आहे. या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक तसेच डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा जीवावर बेतण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, २०२३ मध्येच महापालिका प्रशासनाने कोट्यवधी खर्चुन रुग्णालयाचे नुतनीकरण केले होते.
ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय येनकेन प्रकारे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता या रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील आवारातील छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारवार घडत आहेत.
गतवर्षी पाहणी दौऱ्यात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी कळवा रुग्णालयाचा मेकओव्हर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानतर तत्कालीन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोट्यवधीचा निधी खर्चून डागडुजी देखील केली होती. तरीही रुग्णालयाच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना सुरूच असल्याने चिंता व्यक्त होत आहे.