एसटीच्या सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

23 Jul 2024 18:05:38

एसटी
 
ठाणे : प्रवासात गहाळ झालेली वस्तू परत मिळेल याची सहसा शाश्वती नसते. पण एसटीच्या सफाई कर्मचाऱ्यामुळे प्रवाश्याचे गहाळ झालेले पैशांचे पाकीट परत मिळाले आहे. कोल्हापूर - ठाणे एसटी बसमध्ये सीटच्याखाली पडलेले पाकीट बसची साफसफाई करताना मोतीलाल राठोड या स्वच्छता कर्मचाऱ्याने संबंधित प्रवाश्याला संपर्क साधुन परत केले. मोतीलाल राठोड यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
ठाण्यातील वंदना एसटी स्टँडवर शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर - ठाणे ही एसटी बस प्रवाशांना सोडुन आगार क्रमांक २ येथे आली. दैनंदिन कामाचा भाग म्हणून प्रवास करुन आगारात आलेल्या गाडीची सफाई कर्मचाऱ्याकडून साफसफाई केली जाते. ठाणे आगार क्रमांक २ येथे कार्यरत सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड या बसची सफाई करत असताना पैशाचे पाकीट सापडले.
 
या पाकिटात ३ ते ४ हजाराची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे होती. पाकिटातील कागदपत्रामध्ये आढळलेल्या मोबाईल क्रमाकावर फोन केला असता ते पाकीट मिलिंद साळवी यांचे असल्याचे कळताच राठोड यांनी त्यांना संपर्क करून पाकीट परत केले.अशी माहिती एसटीचे जनसपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
 
वास्तविक पाकिटातील तीन ते चार हजाराची रक्कम काही फार मोठी नव्हती. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पहाता सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम मोठी होती.मोतीलाल राठोड पाकीटातील पैसे सहजपणे ठेऊ शकले असते. पण त्यांनी मोहाला बळी न पडता सदर प्रवाश्याला पाकीट परत करून आपल्या प्रामाणिकपणाची प्रचिती देण्यासह जनमानसात लालपरीची प्रतिमा उंचावण्याचा छोटासा प्रयत्न केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0