केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे जुळते कौशल्य विकासाचे व्हिजन.
23-Jul-2024
Total Views |
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये पहिला अर्थसंकल्प आज सादर केला. सदर अर्थसंकल्प हा देशाला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून युवा, महिला, शेतकरी आणि गरीब सक्षम होतील. या अर्थसंकल्पात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने जाहीर केलेल्या योजना तरुणांच्या आकांक्षाना ताकद देतील असे मत महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, "मोदी सरकारने रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी विशेष तरतूद केली आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत 'रोजगार संबंधित प्रोत्साहन' या योजनेत तीन प्रमुख योजना जाहीर करण्यात आल्या असून, रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करत सरकारने पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या काळात ४ कोटींहून अधिक तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा अर्थसंकल्प भारतातील सर्व वर्गांना विशेषतः तरुण पिढीला विकसित बनवणारा अर्थसंकल्प आहे.
या महत्त्वकांक्षी अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामणजी यांचे मनःपूर्वक आभार!" "देशातील २० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट असून, त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. सोबतच कालानुरूप आवश्यक नवे कौशल्य कोर्सेस सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत. विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना महाराष्ट्रात देखील आम्ही आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती करून, लाखो युवकांना प्रशिक्षण देण्यास सज्ज आहोत.
पुढील पाच वर्षात एक करोड तरुणांना देशातील टॉपच्या कंपन्यांमध्ये कौशल्य शिक्षण दिले जाणार आहे, दरमहा ५ हजार रुपये इंटर्नशिप भत्ता आणि ६ हजार रुपयांची एकरकमी मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील 'मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना विद्यावेतन, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे.
तसेच मॉडेल स्किल लोन योजनेद्वारे जवळपास २५ हजार तरुणांना ७.५ लाख रुपयापर्यंतचे कौशल विकास शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तरुणांच्या विकासासाठी एकाच दिशेने प्रयत्न करत असल्याने त्याचा दुप्पट लाभ महाराष्ट्रातील तरुणांना होईल!" असे देखील कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी बोलताना सांगितले.