हिंसाचारग्रस्त बांगलादेशमधून ४,५०० विद्यार्थी मायदेशी परतले; परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा भारताची मदत

22 Jul 2024 11:38:29
 bangladesh
 
ढाका : बांगलादेशात आरक्षणविरोधी हिंसाचार भडकल्यानंतर ४,५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. यासोबतच परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, नेपाळमधील ५०० विद्यार्थी, भूतानचे ३८ आणि मालदीवमधील एक विद्यार्थी बांगलादेशातून भारतात पोहोचला आहे. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालय भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 'आतापर्यंत ४,५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. ढाका येथील भारतीय उच्चायुक्त आणि चितगाव, राजशाही, सिल्हेट आणि खुलना येथील सहाय्यक उच्चायुक्त भारतीयांना मायदेशी परत येण्यास मदत करत आहेत. भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा आणि विमानतळांवर नागरिकांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.
 
बांगलादेशमध्ये ८,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. भारत आणि बांगलादेश दरम्यान हवाई सेवेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी बांगलादेशच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि व्यावसायिक विमान कंपन्यांशी समन्वय साधत आहे. भारतीय उच्चायुक्तालय हे भारतीय विद्यार्थी आणि बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या इतर भारतीयांसाठी संपर्क केंद्र आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले की, बांगलादेशमध्ये एकूण भारतीय नागरिकांची संख्या सुमारे १५ हजार आहे, ज्यात ८,५०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बांगलादेशातील बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षेसाठी गस्त वाढवण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0