“एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे” - अशोक सराफ

22 Jul 2024 11:52:35

ashok sarad 
 
 
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मिळवलेल्या यशानंतर आता पुढचा भाग अर्थात धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रविण तरडे दिग्दर्शित, लिखित या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांची असून अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
 
या ट्रेलर लॉंच सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनीही उपस्थिती लावत धर्मवीर २ ला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, “एका राजकीय क्षेत्रातील व्यक्तीवर अशा चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, हे पहिल्यांदाच बघितलं. राजकारण व अभिनय दोन वेगळी टोकं असतानादेखील एक सुंदर चित्रपट बनू शकतो, हे आम्ही ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आला तेव्हा आम्ही हे पाहिलेलं आहे आणि आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता वाढली आहे. आता यापुढे काय बघायला मिळणार हे निश्चित कळत नाही. हा चित्रपट वेगळी कथा दाखवेल, असं मला निश्चित वाटतं. हा सिनेमा बनविणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं.कारण- ते एका वेगळ्या विषयावर चित्रपट बनवतात आणि तो चित्रपट हिट होतो. चित्रपटाचा ट्रेलर बघता, ‘धर्मवीर‘चा हा दुसरा भागदेखील हिट व्हायला हरकत नाही. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी या चित्रपटाचे दोन, तीन किंवा चार कितीही भाग बनवावेत. त्यांनी ते बनवले पाहिजेत आणि लोकांपर्यंत एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे पोहोचवलं पाहिजे, ते दाखवलं पाहिजे, असं मला मनोमन वाटतं”.
 
दरम्यान, ‘धर्मवीर : २’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास ९ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, क्षितीश दाते यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0