रसिका शिंदे-पॉल
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा नसलेली एकही व्यक्ती चित्रपटसृष्टीत मिळणार नाही. मग आपली मराठी चित्रपटसृष्टी मागे कशी पडेल. नुकताच ‘डंका हरीनामाचा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयस जाधव यांनी केले होते. पण तुम्हाला माहित आहे का डंका चित्रपटात रजनीकांत यांनी काम करावं अशी इच्छा दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केली होती. डंका हरीनामाचा या चित्रपटाच्या संपुर्ण टीमच्या ‘दै. मुंबई तरुण भारत’सोबत गप्पा रंगल्या होत्या.
‘डंका हरीनामाचा’ या चित्रपटाचे निर्माते रवींद्र फड म्हणाले की, “वारकर संप्रदायातील असल्यामुळे लहानपणापासून पांडूरंगाची भक्ती मी पाहिली आणि अनुभवली होती. आणि दादासाहेब फाळकेंच्या चित्रनगरीत लहानाचा मोठा झाल्यामुळे चित्रपट करायचा हा विचार होताच; पण सोबतच मराठी चित्रपटांसाठी काहीतरी वेगळं करावं असा ध्यास आम्ही घेतला होता. आणि त्यासाठी चक्क आम्ही थेट रजनीकांत यांना डंका चित्रपटासाठी विचारणा केली होती. परंतु, त्यांच्या तारखा मिळणं जरा कठीण झाल्यामुळे ते शक्य झालं नाही पण आम्ही प्रयत्न पुर्ण केला होता”, असे निर्माते म्हणाले.
दरम्यान, ‘डंका हरीनामाचा’ या चित्रपटाचे कथानक विठ्ठलाची मुर्ती चोरीला जाते आणि तिच्या शोधासाठी गावकरी काय आटापिटा करतात याचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळतो. या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, अविनाश नारकर, रसिका सुनील, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, सयाजी शिंदे यांच्यासह अनेकांच्या प्रमुख भूमिका आहेत.