आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा तथा गुरूपौर्णिमा. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरू हे नित्य वंदनीय, पूजनीय, स्मरणीय आहेतच. पण, आजचा दिवस या ज्ञानाचा सागर आणि जीवनाचा आधारवड असलेल्या गुरूजनांच्या कधीही न फिडणार्या ऋणांप्रती शिष्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा. व्यक्ती लहान असो अथवा मोठा, श्रीमंत अथवा गरीब, तो कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी गुरूशिवाय तरणोपाय नाहीच. तेव्हा, मनोरंजन, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी आज खास गुरूपौर्णिमेनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधून व्यक्त केलेली ही गुरूप्रेरणा...
गुरूपदावर जाण्याची साखळी आहे आणि माझ्या शिष्यांकडून मला ती प्राप्त झाली.
माझ्या जीवनात माझे तीन गुरु आहेत. एक सबंध आयुष्याला कलाटणी देणारी माझी आई; कारण तिला मी गुरूदेखील मानतो. मुळात ती माझी गुरू व्हावी आणि मी तिचा शिष्य व्हावं, असं काही ठरवून झालं नाही, तर तो निसर्गाचा नियम होता. पण, त्यानंतरचा आमचा माय-लेकाचा प्रवास हा पदोपदी गुरू-शिष्याचा देखील ठरला. दुसरे माझे अध्यात्मिक गुरु ज्यांनी 20 वर्षांपूर्वी माझं जीवनच बदललं, मला एक नवी दिशा दिली. अध्यात्माच्या मार्गाने माझ्या आयुष्याला स्थिरपणा दिला, असे आनंदस्वरुप सद्गुरू हे माझे दुसरे गुरु. त्यानंतर नाट्यसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करुन देण्यास मदत करणारे आणि नाटक हेच जगण्याचे साधन आहे, याची जाणीव मला ज्यांनी करुन दिली ते म्हणजे पंडित सत्यदेव दुबे. नाटकाकडे पाहण्याचा माझा संपूर्ण दृष्टिकोनच त्यांनी बदलला होता. त्यामुळे आज लेखक-दिग्दर्शक-अभिनेता म्हणून समाजात वावरत आहे, ते या तीन गुरुंमुळेच आणि मुळात मला असं वाटतं की, गुरू आणि शिक्षकात एक फरक आहे; तो असा की ज्यावेळी ‘अॅकेडमी ऑफ थिएटर आर्ट्स’चा संचालक जेव्हा असतो, तेव्हा मी पगारी शिक्षक असतो आणि गुरू हा सर्वांगाने ज्ञान देणारा असतो, जो कधीच मोबदल्याची अपेक्षा करत नाही. गुरूपदावर जाण्याची एक साखळी असते आणि आज जेव्हा मी त्या पदावर आहे, असं माझ्या शिष्यांकडून मला जाणवून दिलं जातं, तेव्हा मला त्यांच्या प्रगतीशिवाय कसलीच अपेक्षा नसते.
- योगेश सोमण, दिग्दर्शक-लेखक-अभिनेते
अंधानुकरण न करण्याचा मोलाचा गुरूपोदेश
माझे गुरु आहेत पद्मश्री पंडित सी. आर. व्यास. माझ्यात आणि त्यांच्यात वयाचं अंतर खूप होतं, पण त्यांनी मला वात्सल्याच्या भावनेने शिकवलं. ते इतरांना खूप रागीट वाटायचे, पण त्यांचे ते रूप मला कधी दिसलं नाही. त्यांनी मला एक महत्त्वाची शिकवण दिली, ती म्हणजे ते मला सांगायचे की, “मी जे काही शिकवतोय, ते तू आंधळेपणाने शिकू नकोस. तुझ्या बुद्धीपातळीवर तू ते जोखून घे. तू त्याचं अंधानुकरण कधीही करू नकोस.” त्यांच्याविषयी एक महत्त्वाची आठवण माझ्या आजही लक्षात आहे. ती म्हणजे मी त्यांच्याकडे शिकत असताना माझ्या महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष सुरू होते. त्यामुळे मी दीड महिना शिकवणीला गेलो नव्हतो. त्यावेळी मोबाईल फोन नव्हता. मी दीड महिन्यांनी त्यांना कॉल केला. तेव्हा ते म्हणाले, “गुरू जीवंत आहे, हे बघायला तरी कॉल करायचा. तू आमच्या घरच्यांसारखा आहेस. तू घरी आलास की, आम्हाला बरं वाटतं. त्यामुळे तू घरी येत राहा.” त्यांचे ते उद्गार मला खूप भावले आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत सावलीसारखा राहिलो.
-संजीव चिम्मलगी, प्रसिद्ध शास्त्रीय गायक
माझ्या दोन्ही गुरूंना शतश: वंदन
माझ्या आयुष्यातील दोन महत्त्वाचे गुरु म्हणजे मला गायन शिकवणार्या देवकीताई आणि पं. रघुनंदन पणशीकर. देवकीताईंकडे मी गाणं शिकायला होते. तेव्हा एकदा माझा अपघात झाला होता. मला लागलं होतं. मी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मला एक तान सराव करायला दिली आणि त्या काही कामासाठी स्वयंपाकघरात गेल्या. येताना त्या माझ्यासाठी खीर घेऊन आल्या. त्यांनी जेव्हा पाहिलं की, मला दुखापत झाली आहे, तेव्हा त्यांनी मायेने माझी विचारपूस केली आणि मला मायेने ती खीर खाऊ घातली. पं. रघुनंदन पणशीकर हे माझे गुरू. ते जेव्हा पहिल्यांदा मी संगीतबद्ध केलेलं गाणं गाणार होते, तेव्हा मला दडपण आलं होतं. पण, तेव्हा ते मला म्हणाले, “स्टुडिओमध्ये हे विसरून जा की, मी गुरू आणि तू शिष्य आहेस. इथे तू संगीतकार आणि मी गायक आहे , एवढंच लक्षात ठेव आणि दडपण घेऊ नकोस.”
-केतकी माटेगावकर, प्रसिद्ध गायिका, संगीतकार
वेळ जीवनातील सर्वात महत्त्वाचा गुरू
चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी स्वत:ची पारख करुन, स्वत:च्या चुकांमधून शिकत मी दिग्दर्शकीय प्रवास केला. त्यामुळे या क्षेत्रातील माझा मीच गुरू आहे असंच म्हणेन. पण, दिग्दर्शक हे क्षेत्र काय आहे? त्याबद्दल आणि त्यानुसार माझी जडणघडण केली ती म्हणजे, जगतकुमार पाटील यांनी आणि वेळ हा दुसरा महत्त्वाचा गुरू. प्रत्येक टप्प्यावर आणि वेळेत भेटणारे मार्गदर्शक, तुमचं काम हेच तुमचे आजन्माचे गुरू असतात.
- गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक
पदोपदी असंख्य गुरू जीवनाला कलाटणी देतात
जीवनात केवळ एक गुरू असून चालत नाही. प्रत्येक क्षणाला, प्रसंगात काहीतरी शिकवण देऊन जाणारे असंख्य गुरू आपल्या जीवनाला आकार देत असतात. माझ्या जीवनात लेखक आमि दिग्दर्शक या दोन्ही कलांना कलाटणी देणारे गुरू लाभले ते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून कलेकडे पाहण्याची नवी दृष्टी मला चंद्रकांत यांनी दिली.
- अभिजीत गुरु, लेखक
माणूस म्हणून सुंदर असल्यास सगळं काही...
माझ्या आयुष्यात माझी गुरू ही माझी आई. कारण, नृत्याचं शिक्षण मी तिच्याकडूनच घेतलं आणि त्याशिवाय नृत्य क्षेत्रात करिअर करु पाहण्यासाठी मी लहाणपणापासून एकलव्यासारखं ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना पाहूनच शिकत होतो. माझ्यासाठी आई ब्रह्मा, सरोज खान विष्णू आणि माधुरी महेश्वर आहे आणि आता जेव्हा मी नृत्य शिकवतो, तेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी गुरूच्या स्थानी आहे. त्यामुळे आजही मी माझ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात येण्यापूर्वी स्वत:वर प्रेम आणि विश्वास असावाच याची शिकवण देतो. कारण, ज्यावेळी तुम्ही माणूस म्हणून सुंदर असता, तेव्हा तुमचं संपुर्ण आयुष्य आणि सोबतच तुमची कला आणि तुमच्यातील कलाकार हा सुंदररित्या जगासमोर प्रस्तुत होतो.
- आशिष पाटील, नृत्य दिग्दर्शक
शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहणारी साधना म्हणजे गुरू
गुरू म्हणजे अशी व्यक्ती, जी तुम्हाला केवळ दिशा किंवा मार्ग दाखवत नाही, तर त्या प्रवासात ती कायम तुमच्या सोबत विचारांच्या स्वरुपात असते. गुरू हा कायम विचार आणि संस्काररुपात तुम्हाला मार्गदर्शन करीत असतोच. माझ्या मते, आपण जसे वयाने मोठे होतो, आयुष्य विविध अनुभव पदरात पाडते, तसे प्रत्येक प्रसंगात आपले गुरू बदलत असतात; जे आपल्याला त्यांच्यापरिने जीवनाचा सार समवावू पाहतात. बर्याचदा काही व्यक्तींना आपण गुरुस्थानी ठेवतो; ज्यातील पहिले म्हणजे आई-वडील. त्यामुळे गुरु ही एक अशी साधना आहे, जी तुमच्या अखेरच्या श्वासापर्यंत सोबत राहते.
- भार्गवी चिरमुले, अभिनेत्री
(संकलन : रसिका शिंदे-पॉल, दिपाली कानसे)