आषाढ पौर्णिमा अर्थात गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भारतीय शिक्षण संस्कृतीचे भूषण असणारी गुरू-शिष्य परंपरा आजच्या काळातही टिकवू पाहणार्या अशाच दोन गुरूकुलांची थोडक्यात ओळख करुन देणारा हा लेख...
गुरवः सन्ति बहवः शिष्यवित्तापहारकाः।
दुर्लभः स गुरूर्लोके शिष्यचित्तापहारकः॥
अर्थात, आपल्या विद्यार्थ्याकडून शुल्करूपाने पैसा वसूल करणारे शिक्षक सगळीकडेच भेटतात. परंतु, शिष्याचे अंतःकरण आपल्याकडे आणि आपल्या शिकवण्याकडे खेचून घेणारा शिक्षक मात्र फार क्वचित पाहावयास मिळतो. विद्यादान हे ‘दान’ असल्यामुळे गुरूने निःस्वार्थी भावनेने अध्यापन करावे आणि अध्ययनाअंती शिष्याने गुरूला दक्षिणा द्यावी, ही प्राचीन भारतीय परंपरा आहे. पूर्वी उपनयन संस्कार झाल्यावर विद्यार्थी गुरूगृही राहत असत आणि अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गृहस्थाश्रमी होऊन आपापल्या कुळाचाराप्रमाणे व्यवसाय-उद्योग करत असत. आताच्या काळात जरी शाळा उदयास आल्या असल्या, तरी आजही अशाप्रकारे गुरूकुलात जाऊन राहण्याची, शिकण्याची परंपरा जपू पाहणारे बरेच लोक या भारतवर्षात कार्यरत आहेत. कर्नाटकमधील शृंगेरी, आंध्र प्रदेशातील तेनाली, महाराष्ट्रातील पुणे अशा जवळपास प्रत्येक राज्यातील एक-दोन गावांमध्ये गुरूकुले अस्तित्त्वात आहेत, जी भारतीय गुरू-शिष्य परंपरा चिरंतन टिकवून ठेवण्यासाठी आपले मोलाचे योगदान देत आहेत.
‘संवर्धन ज्ञानकुलम् फाऊंडेशन’ संचालित ‘ज्ञानकुल’ नामक मुंबईत चेंबूरस्थित एका अध्ययन केंद्राचा आज वर्षपूर्ती सोहळा आहे. मागील वर्षी ते ‘ज्ञानकुल’ म्हणून नावारूपाला आले असले, तरी 2012 सालापासून भांडुपमध्ये ‘लर्निंग होम’ आणि 2016 सालापासून पवईमध्ये ‘वात्सल्य वाटिका’ या नावाने ते आजही कार्यरत आहे.
शिक्षकाने शिकवल्यानंतर मुलांनी ते ग्रहण करण्यापेक्षा विद्यार्थ्याने स्वतःहूनच कष्ट करून, चिंतन करून ज्ञानार्जन केले पाहिजे, या भावनेतून कमलाकर इंदुलकर यांनी ‘ज्ञानकुला’तील वातावरण असे ठेवले आहे की, तेथे ‘शिकवण्या’ला नाही, तर ‘शिकण्या’ला अधिक महत्त्व दिले जाते. हाच प्राचीन गुरूकुलांचादेखील मूलभूत सिद्धांत आहे. गुरूपरंपरा जपताना ...
गुरूकुलामध्ये दहावीपर्यंतची मुले शिकत आहेत. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट केले असले, तरी सर्व वयोगटांतील मुले खरोखरच एका कुलातील असल्यासारखी बंधुभावाने राहतात.
‘ज्ञानकुला’मध्ये ‘पंचकोशात्मक विकास’ या पद्धतीने शिक्षण दिले जाते. यामध्ये पाच वर्गांत विषयांची मांडणी केलेली असते. त्यातील ‘प्रमाण’ म्हणजे जे सामान्य शाळांमध्ये शिकवले जाते, ते इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान आणि संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषा. ‘कलानिलयम् म्हणजे नृत्य, गायन, वादन, चित्रकला या कलांचे शिक्षण. ‘स्वारस्य’ म्हणजे शारीरिक व्यायाम, सूर्यनमस्कार, योग आणि लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार चालवणे इ. शिवकालीन युद्धकला. ‘दाक्ष्य’ म्हणजे कौशल्य विकासासाठी काही शिवणकाम, बागकाम, स्वयंपाक इ. शिकणे आणि धार्मिक शास्त्रांचे ज्ञान होण्यासाठी ‘ब्रह्मजिज्ञासा’ म्हणजे रामायण व महाभारत समजून घेणे, अशा पाच प्रकारचे शिक्षण ‘ज्ञानकुला’मध्ये दिले जाते.
भारतीय गुरूकुल पद्धतीप्रमाणे ‘ज्ञातपासून अज्ञातपर्यंत’ म्हणजे सोप्यापासून कठिणापर्यंत अशा मार्गाने शिकवले जाते. खेळांच्या किंवा श्लोकांच्या माध्यमातून हे विषय शिकवल्यामुळे सर्व मुले एकत्र येऊन शिकताना खर्या अर्थाने शिक्षणाचा आनंद घेतात. ही मुले तत्कालीन आणि वैदिक अशा दोन्ही पद्धतींनी शिकतात. म्हणजे भास्कराचार्यांनी रचलेल्या ‘लीलावती’ ग्रंथातील सूत्रबद्ध गणित कंठस्थ करताच, त्यांना सामान्य गणित सहजी समजते. ‘अमरकोश’ ग्रंथातील प्राण्यांची नावे पाठ केल्यावर विज्ञानातील जीवशास्त्र समजून घेणे सुकर होते. तसेच, इतिहास, भूगोल यांसारखे विषय केवळ पुस्तकी न ठेवता, मुलांना तेथे नेऊन ते ठिकाण प्रत्यक्ष दाखवून माहिती समजावून सांगितली जाते. ‘ज्ञानकुलम्’ म्हणजे हसत-खेळत शिक्षणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात केवळ नोकरी न करता, समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे; स्वावलंबी, स्वाभिमानी आणि जबाबदार भारतीय नागरिक बनावे, या उद्देशाने ‘ज्ञानकुलम्’ आज 10 वर्षे अविरत कार्यरत आहे.
‘ज्ञानकुलम’मध्ये शिकत असल्यामुळे मला नक्कीच इतर सामान्य शाळेत शिकणार्या मुलांपेक्षा काहीतरी वेगळे करायला मिळत आहे. आम्ही सकाळी लवकर उठून प्रार्थना, जप करतो. पंचांग सांगितले जाते. मग सुभाषित म्हणतो. शंखवादन करतो. त्यानंतर लहान मुलांच्या गटाचे संस्कृताध्ययन आणि मोठ्यांसाठी सूर्यनमस्कार, योग आणि लाठीकाठी असे वर्ग होतात. लाठीकाठीची काठी पहिल्यांदा हातात घेतली, तेव्हा ती खूप लागत असे. खूप कंटाळा यायचा. पण, तेव्हा गुरूंचे ऐकले म्हणून आज आम्ही बाहेरगावी जाऊनदेखील लाठीकाठीचे कार्यक्रम सादर करू शकतो. अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर, वैदिक गणित श्लोकांमध्ये असल्यामुळे ते चालता-बोलता पाठ होते. त्यामुळे त्याचा ताण येत नाही आणि सूत्रे पाठ झाली की, गणित करणे सोपे जाते. तसेच, प्रत्येकाला समजेपर्यंत, जमेपर्यंत गुरू ते पुनःपुन्हा सांगतात आणि कायम पाठिंबा व प्रेरणा देतात. ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन, त्या किल्ल्यांवर जाऊन इतिहास ऐकत असल्यामुळे किल्ला कसा असेल, याची फक्त कल्पना न करता, तिथे जाऊन प्रत्यक्ष शिकल्यामुळे ते मनावर कायमचे कोरले जाते. अलीकडे आम्ही 350 ठिकाणी जाऊन शिवाजी महाराजांच्या कथा सांगितल्या. अशा अनेकप्रकारे आमचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचीदेखील संधी गुरूकुलामुळे मिळते.
- पृथा यादव, विद्यार्थिनी, इयत्ता सहावी
‘संस्कृत संवर्धन मंडळ’ संचालित ‘वाग्वर्धिनी पाठशाळा’ हे पैंगिण, काणकोण, गोवा येथील गुरूकुल. नोव्हेंबर 2016 मध्ये वे. मू. दत्तभार्गव टेंग्से गुरूजींनी ही पाठशाळा स्थापन केली. आजही ही पाठशाळा 22 विद्यार्थ्यांसह गुरूजींच्या निवासस्थानी निरंतर ज्ञानदान करत आहे.
पाठशाळेमध्ये वेद आणि शास्त्रांचे अध्ययन केले जाते. आज 15 विद्यार्थी असून त्यांपैकी वेदाचे अध्ययन करीत आहेत. ऋग्वेद संहिता, शाखाध्ययन, दशग्रंथ, पद, क्रम, जटा व घनाचे अध्ययन करण्यासाठी साधारणपणे एक तप अर्थात 12 वर्षे लागतात, तर शास्त्रांपैकी न्यायशास्त्राचे अध्ययन पाठशाळेमध्ये केले जाते. त्याचे 21 खंड पूर्ण शिकण्यासाठी सहा वर्षे आवश्यक असतात. चार विद्यार्थी व तीन विद्यार्थिनी आता पाठशाळेत शास्त्राध्ययन करत आहेत.
पाठशाळेमध्ये आठ ते 20 वर्षे वयोगटातील मुले आहेत. काही मुले उपनयन संस्कार झाल्यावर लगेच आली, तर काही आठवी, दहावीपर्यंतचे शाळेतील शिक्षण घेऊन मग आली आहेत. त्यामुळे अध्ययनावेळी वयाप्रमाणे गट पडत नसून त्यांच्या शिक्षणाच्या स्तरानुसार गट केले जातात. त्यातील मोठी अर्थात विद्यावृद्ध मुले लहानांना शिकवतात, जेणेकरून त्या मुलांमध्ये अध्यापन कौशल्यदेखील विकसित होते. मुले सकाळी 5 वाजता उठून योग, सूर्यनमस्कार करतात. दिवसभर अध्ययन करतात आणि संध्याकाळी काही खेळ म्हणजे बहुतकरून क्रिकेट खेळतात. येथे मुले निवासी असल्यामुळे गुरूकुलातील सर्व कामे मुलेच करतात. गुरूपत्नींच्या अनुपस्थितीत मोठी मुले स्वयंपाकदेखील करतात. दैनंदिन जीवनातील प्रत्येक काम प्रत्येक विद्यार्थ्याला करता आले पाहिजे, अशापद्धतीने त्यांना शिक्षण दिले जाते.
‘वाग्वर्धिनी पाठशाळे’त वेदाचे अध्ययन पूर्णतः व शास्त्राचे अध्ययन बहुतांश मौखिक स्वरूपात होते. वेदपाठक गुरूजींनी ऋचा सांगताच, शिष्य त्याची 16 वेळा संथा म्हणजे पुनरुच्चार करतात आणि शास्त्राचे गुरूजी जे शिकवतात, पाठ घेतात, त्यावर चिंतन करून, पूर्णतः ग्रहण करून शिष्यांनी दुसर्या दिवशी त्याचा अनुवाद करायचा असतो. म्हणजे काय समजले ते आपल्या भाषेत सांगायचे असते. अर्थातच, प्रत्येक विद्यार्थ्याला विषयाचे संपूर्ण ज्ञान होईपर्यंत गुरूजी पुनःपुन्हा त्याविषयी चर्चा करतात. सर्व विद्यार्थ्यांची मासिक, षड्मासिक, वार्षिक आणि संपूर्ण ग्रंथाच्या शेवटी त्यांच्यात्यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे मौखिकी किंवा लेखी परीक्षा असते. त्यासाठी ते इतर गुरूकुलांतील स्वामींकडे जातात किंवा ते स्वामी ‘वाग्वर्धिनी पाठशाळे’त येऊन परीक्षा घेतात.
पाठशाळेतील विद्यार्थी आसपासच्या गावातील साप्ताहिक सभांना, चर्चासत्रांना जातात. राज्यस्तरीय, राष्ट्रीय वेदपठण स्पर्धांमध्येदेखील भाग घेतात. ही पाठशाला पूर्णपणे हितचिंतकांच्या व सरकारच्या अनुदानावर चालते. अर्थार्जन हा मूळ हेतू नसून विद्यादान व आपली प्राचीन गुरूपरंपरा पुढे नेणे, हेच ध्येय मनी बाळगून ‘वाग्वर्धिनी पाठशाळा’ गेली आठ वर्षे निरंतर सेवारत आहे.
गुरूकुलामध्ये राहिल्यामुळे आधुनिक प्रलोभनांपासून दूर राहून अभ्यास करता आला. अभ्यासाकडे किंवा शास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. उपजीविकेचे साधन काय, याचा विचार न करता, शास्त्र टिकवण्यासाठी आपली परंपरा जपण्यासाठी अभ्यास केला पाहिजे, हे कळले. शिक्षण झाल्यानंतर शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये नोकरी न करता, परंपरेनुसार गुरूकुलात शिकविण्याचा निर्णय मनात किंतु-परंतु न येता निर्धास्तपणे घेता आला. आम्ही गुरूजींकडे माणूस म्हणून न बघता, दक्षिणामूर्तीच्या स्वरूपात बघतो. त्यांचे वय किंवा गुणदोष न पाहता, त्याच्या विद्येचा सन्मान करण्यासाठी आपसूक मान खाली झुकते. गुरूकुलात राहिल्यामुळे अभ्यासासोबतच व्यवहारात, समाजात कसे राहिले पाहिजे, याचेही ज्ञान झाले. बर्याच गोष्टींचा निर्णय घेताना विचारांचा स्तर उंचावला. आयुष्यात घडणार्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीबद्दल, यश-अपयशाबद्दल गुरूजींशी बोलल्यावर विलक्षण समाधान लाभते. सध्या मी शिकवताना माझ्या शिष्यांसोबत मी कसं राहावं, हे गुरूकुलामध्ये गुरूजींसोबत राहिल्यामुळे समजते.
- कल्याणी हर्डीकर (माजी विद्यार्थिनी)