नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी सात दशकांपासून नाकारलेले नागरिकत्व दिल्याबद्दल पश्चिम पाकिस्तानी विस्थापितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. पश्चिम पाकिस्तानी विस्थापित संघटनेचे अध्यक्ष लाभा राम गांधी यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहेत.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या भेटीत विस्थापितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. विस्थापनाच्या अवघड काळात भक्कम पाठींबा दर्शवल्याबद्दल आणि सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. आमचे कल्याण लक्षात घेत आम्हाला सामावून घेताना भारतीय समाजाने दर्शवलेले प्रेम आणि औदार्य हृदयस्पर्शी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गेली सात दशके झालेल्या अन्यायाचा उल्लेख करून संघटनेने पूर्वीच्या सरकारांनी आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले. १९४७ मध्ये फाळणी झाल्यामुळे पश्चिम पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेले विस्थापित जम्मू कश्मिरमधील प्रामुख्याने जम्मू, कथुआ व राजौरी या जम्मू विभागातील जिल्ह्यांमध्ये वसले आहेत. सुमारे ५ हजार ७६४ कुटुंबे फाळणीनंतर जम्मूत स्थलांतरित झाली. कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू कश्मिरमधील अनेक उपेक्षितांच्या मूक समस्यांची दखल घेतली गेली व त्यांना न्याय मिळाला, असे विस्थापितांनी म्हटले आहे.