काँग्रेसचा हिंदूविरोध योगायोग नव्हे तर षडयंत्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पराभव हाच विजय असल्याचे ‘बालबुद्धी’स सांगण्यात काँग्रेस व्यस्त

    02-Jul-2024
Total Views |
prime minister narendra modi
 
 
नवी दिल्ली :      हिंदू समाज सहनशील असल्यानेच भारतीय लोकशाही टिकून राहिली आहे. मात्र, हिंदू धर्मास लक्ष्य करण्यासाठी अनेक शक्ती दीर्घकाळपासून कार्यरत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा हिंदूविरोध हा योगायोग नसून त्यामागील षडयंत्र हिंदू समाजाने समजून घ्यावे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसचा समाचार घेतला. राष्ट्रपती अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हिंदूविरोधी वक्तव्यांचा आणि धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी अभिनंदन प्रस्ताव बहुमताने मंजुर करण्यात आला.

हिंदू धर्म हा सहिष्णू असून हिंदू समाजाच्या सहनशील वृत्तीमुळेच देशातील लोकशाही आणि विविधता टिकून राहिली आहे. मात्र, आज हिंदूंवर ते हिंसक असल्याचे लावण्यात आलेले आरोप अतिशय गंभीर असून हा आरोप देश अनेक शतके विसरणार नाही. अर्थात, याद्वारे असे आरोप करणाऱ्यांचे संस्कार उघडे पडले आहेत. यापूर्वीही याच मंडळींनी ‘हिंदू दहशतवाद’ संकल्पना जन्मास घातली होती. त्याचप्रमाणे हिंदूंना आराध्य असलेली ‘शक्ती’ही संपविण्याची भाषा करण्यात आली होती. हिंदू समाजास लक्ष्य करण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा हिंदूविरोध हा योगायोग नसून षडयंत्र आहे, याचा विचार हिंदू समाजाने करावा; असे पंतप्रधानांनी म्हटले.
 
काँग्रेस आणि काँग्रेसची इकोसिस्टीमचे आव्हान २०१४ सालापासून केंद्र सरकारसमोर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारताची लोकशाही, लोकसंख्या आणि विविधतेस लक्ष्य करण्याचे प्रयत्न दीर्घकाळपासून होत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील देशाच्या प्रगतीविषयी संशय निर्माण करणाऱ्या आणि देशाला कमकुवत करण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रारंभीच रोखले जाण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. अशा शक्तींना भारतातील लोकही मदत करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
 
ही इकोसिस्टीम काँग्रेसच्या गेल्या ७० वर्षांच्या कार्यकाळात मजबूत झाली आहे. मात्र, यापुढे काँग्रेसच्या या इकोसिस्टीमलसा त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन त्यांच्या देशविरोधी षडयंत्रांना हाणून पाडले जाईल; असा इशाराही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला आहे. त्याचवेळी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सरकार गंभीर असून त्याविषयी देशात अनेकांना अटक होत आहेत. तरूणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्य़ांना मोकळे सोडले जाणार असून संपूर्ण व्यवस्था मजबत केली जाईल, अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आता परजिवी असल्याचा टोलाही आपल्या भाषणात लगावला. सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला १०० जागा गाठणे शक्य झाले नसून १९८४ नंतर एकदाही २५० चा आकडाही गाठता आला नसल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. काँग्रेस पक्ष हा मित्रपक्षांच्या जीवावर जगत असून मित्रपक्षांच्या जनाधारावर कब्जा करण्याची त्यांची मानसिकता आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
 

‘बालबुद्धी’वर टिका आणि राहुल गांधींचा अनुल्लेख

आपल्या संपूर्ण भाषणात पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेखही केला नाही. परिणामी काँग्रेससह इंडी आघाडीने गदारोळ सुरूच ठेवला होता. त्याचवेळी “काँग्रेस पक्ष सध्या पराभव हाच विजय असल्याची बालबुद्धीची समजूत काढत आहे” असा टोला राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. ‘बालबुद्धी’स १०० पैकी ९९ गुण मिळाल्याचे वाटत असले तरीदेखील ५४३ पैकी ९९ गुण मिळाल्याचे सत्य लवपता येणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. लोकसभेत ‘बालबुद्धी’ दाखवणाऱ्यांवर आर्थिक घोटाळा, ओबीसी समुदायाचा अपमान, सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आदी विविध खटले सुरू असल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्याचवेळी ‘बालबुद्धी’कडून संसदीय लोकशाहीस असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
गदारोळाचा निषेध करणारा प्रस्ताव संमत

पंतप्रधानांचा भाषण सुरू असताना विरोधी पक्ष सातत्याने गदारोळ करत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या खासदारांना वेलमध्ये येण्यास सांगत असल्याविषयी त्यांना झापलेही होते. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकाराचा निषेध करणारा प्रस्ताव लोकसभेत मांडले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजुर करण्यात आला.


अधिवेशनाचे सूप वाजले

अभिनंदन प्रस्ताव संमत झाल्यानंतर अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे सूप वाजले. कामकाज अनिश्चित काळापर्यंत स्थगित करत असल्याची घोषणा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली.