मुंबईचा पावसाळा आणि पालिकेची सज्जता

    02-Jul-2024   
Total Views |
mumbai city bmc rainy season


मुंबईत म्हणावा तसा पावसाने जोर धरलेला नसला तरी पालिकेने पूर्वानुभव लक्षात घेता, सज्जता राखली आहे. त्यानिमित्ताने महानगरपालिकेने मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजना आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा यांचा आढावा घेणारा हा लेख...

मुंबईसाठी ‘मिशन झिरो कॅज्युअल्टी’ घोषित करण्यात आले. पावसाळ्यात जीवितहानी रोखण्यासाठी पालिकेने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवण्याचे कारण म्हणजे, पर्जन्यजलवाहिन्या सिल्टने व तरंगणार्‍या कचर्‍याने भरलेल्या असतात. त्यामुळे त्यात शिरलेल्या पावसाचे पाणी सहजपणे पुढे सरकत नाही आणि ते सिल्ट व कचर्‍यामुळे तुंबते व ते पुरास कारणीभूत ठरते. त्याकरिता नालेसफाई करणे भाग पडते.

दुसरे कारण म्हणजे, मुंबईतील सखल भागात पाणी तुंबणे. याकरिता पालिकेने त्या भागात उपसापंप लावले आहेत. शिवाय, तेथील पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवण्याची व्यवस्था केली आहे.

तिसरे कारण म्हणजे, मुंबईतील नद्यांकडे प्रशासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष. त्यामुळे या नद्यांमधील गाळ काढणे, हे मुख्य काम करावयास लागते. तसेच, काही ठिकाणी संरक्षक भिंतीदेखील बांधाव्या लागतात. तसेच यंदाच्या पावसाळ्यात देखील ९८ ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता वर्तविली आहे.

चौथे कारण महाभरतीच्या दिवशी जर पावसाचा जोर वाढला, तर पालिकेला अधिक उपसापंपांची व्यवस्था करावी लागते.


नालेसफाईची अवस्था

मुंबईत दरवर्षी पावसाळा तोंडावर असेपर्यंत सुरू राहाणारी नालेसफाईची कामे गेल्यावर्षी दि. ३१ मेच्या आधीच पूर्ण झाली होती. त्यासाठी नालेसफाई करण्याची सुरुवात दि. ६ मार्चपासूनच करण्यात आली. यंदा कार्यादेश देण्यात विलंब झाल्यामुळे नालेसफाई कामांचा मुहूर्त हुकला असून, नालेसफाई कामास दि. २० मार्चनंतरच साधारण सुरुवात झाली. त्यामुळे हे नालेसफाईचे काम दि. ३१ मेपूर्वी पूर्ण होणार का, याबद्दल पालिकेस प्रश्न पडला होता. तसेच नालेसफाईच्या कामाकरिता यावर्षी रु. २९२ कोटी खर्च केला जाणार आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यामधील गाळ काढला जातो. वॉर्ड विभाग कार्यालयाच्या माध्यमातून लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधील गाळ व कचरा काढल्याने पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठी मदत होते. पावसाळ्यापूर्वी किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान व पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन हे उद्दिष्ट दरवर्षी ठरविले जाते.

गेल्यावर्षी ९ लाख, ७९ हजार, ८८२ मे. टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेतर्फे निर्धारित करण्यात आले होते. पालिकेने मुदतीच्या आधी म्हणजे दि. ३१ मेपूर्वीच हे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले. यंदाच्या वर्षीही दि. ३१ मेच्या पूर्वी ८० टक्के गाळ काढण्याचे आणि पावसाळ्यादरम्यान २० टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मुंबईत पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ असणे महत्त्वाचे. कारण, मुंबईत २८३ मोठे नाले, १ हजार, ४९० छोटे नाले, रस्त्याच्या कडेला असलेली १ हजार, ३८० गटारे आणि पाच नद्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात जाते. गेल्यावर्षी असलेले ९ लाख, ७९ हजार, ८८२ मे. टनाच्या उद्दिष्टांएवढेच यावर्षीदेखील निश्चित केले आहे.

कामाच्या कंत्राटांमध्ये गेल्यावर्षी अधिक कठोर अटी व शर्तींचा समावेश केला होता. प्रत्येक कामासाठी दृक्श्राव्य चित्रफित आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक होते आणि काम सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना आणि काम संपल्यानंतर अशा तीनही टप्प्यांमध्ये दिनांक, वेळ, रेखांश (रिअलटाईम जिओटॅग) चित्रफित व छायाचित्रे तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदाराना बंधनकरक ठरविले होते. यंदाही याच अटी असणार आहेत.


नालेसफाईचे लक्ष्य व गाळ मे. टनात

डीसिल्टींग टार्गेट (रुपयांत) - २०२४ (२४९ कोटी), २०२३ (२२६ कोटी), २०२२ (१६२ कोटी)
डीसिल्टींग टार्गेट मे. टनमध्ये - १३.१० लाख
डीसिल्टिंग झाले मे. टनमध्ये - १४.२६ लाख
यावर्षी अनेक ठिकाणी कंत्राटदार नेमले आहेत - शहर विभाग (तीन), पश्चिम उपनगर विभाग (१५), पूर्व उपनगर विभाग (दहा)
मोठे नाले साफ करण्याकरिता (१७), मिठी नदीसाफ करण्यासाठी (तीन), महामार्गावरील पर्जन्य जलवाहिन्या साफ करण्यासाठी (पाच)

सखल भागात पूरनियंत्रण उपसापंपयंत्रणा बसविणे

जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ झाली आहे. सुमारे १०० ठिकाणे अशी ठिकाणे वाढली आहेत. त्यामुळे खालील भागात उपसापंप बसविले जाणार आहेत.
सर्वाधिक पंप कुर्ला एल वॉर्ड (५१ पंप), मालाड पी उत्तर (४५ पंप), वांद्रे, सांताक्रुझ पूर्व एच पूर्व वॉर्ड (३५ पंप), कुलाबा, चर्चगेट ए वॉर्ड (३० पंप), वडाळा, नायगाव एफ उत्तर (२४ पंप).

२०२३ साली वाढीव मागणीसह एकूण ४९२ पंप कार्यान्वित होते, तर यंदा २०२४ साली २५ प्रशासकीय विभाग आणि राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयांच्या मागणीनुसार विविध ठिकाणांवर ४८१ पंप बसविण्यात येणार आहेत. हे पंप पालिका भाड्याने घेणार आहे व दोन वर्षांसाठी उदंचन संचांची सेवा देण्यासाठी पालिका तब्बल यंदा १२६ कोटी रुपये खर्च करणार आहे.


ब्रिम्स्टोवॅड प्रकल्पाची कामे

मुंबईतील दि. २६ जुलै २००५ रोजीच्या महापुरात १ हजार, ९४ माणसे मृत्युमुखी पडली. त्यानंतर ब्रिम्स्टोवॅड प्रकल्पाचे काम मुंबईतील १९व्या शतकात बांधलेले मोठे नाले वा वाहिन्या यांचे नूतनीकरण करणे वा बदलणे याकरिता सुरू करण्यात आले. पण, १९ वर्षे उलटली, तरी त्या प्रकल्पाचे काम अजून संपलेले नाही. याचे कारण म्हणजे, अजूनही कामाच्या काही ठिकाणी अतिक्रमणे व न्यायालयात सुरू असलेले खटले इत्यादी कारणांमुळे कामाला भूखंड मिळत नाहीत.

ब्रिम्स्टोवॅड प्रकल्प रचनेमध्ये नाल्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे. कारण, पर्जन्यपाण्याचा स्पर्श वेग तासाला २५ मिमीऐवजी ५० मिमी प्रमाण धरून रचित केला आहे. मुंबईच्या पश्चिम व पूर्व भागात वर्षाला अनुक्रमे सरासरी ३२९ मिमी व ३०९ मिमी पाऊस पडला आहे, असे प्रमाणात धरले आहे. प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज रु. १,२०० कोटी वाढीव बनविलेला होता, तो आता चार हजार कोटींहून अधिक झाला आहे. शहरामधील विकसित जमिनींमुळे नैसर्गिक नाले वाहाण्यासाठी जागाच राहिलेली नाही.

आपत्ती व्यवस्थापन विभाग

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी बाहेरून संचालक नेमण्यात येणार आहे. हे काम मुंबईच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याने संचालकपादी पालिकेच्या निवृत्त अधिकार्‍यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

हा विभाग अतिअत्याधुनिक बनविण्यात आला आहे. हा विभाग २००९ साली सुरू करण्यात आला. प्रत्येक वॉर्डात नियंत्रणकक्ष, ५ हजार, २५८ सीसीटीव्ही, ५२ हॉटलाईन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. थेट प्रक्षेपण आपत्कालीन कक्षात होणार आहे. नियंत्रण कक्षातील संदेशवहनयंत्रणा कोलमडल्यास हॅम रेडिओ तैनात ठेवण्यात येणार आहे. बॅकअपसाठी परळ येथे पर्यायी नियंत्रणकक्ष तैनात ठेवला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने संपूर्ण नियंत्रणकक्ष सज्ज व सक्षम ठेवला आहे. ‘एमएसआरडीसी’नेसुद्धा २४ तास आपत्कालीनकक्ष दि. ३० सप्टेंबरपर्यंत कार्यरत ठेवला आहे.


यंदा २२ वेळा उंच लाटा

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत एकूण २२ दिवस समुद्र किनार्‍यावर ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असून, जून महिन्यात सात दिवस, जुलै महिन्यात चार दिवस, ऑगस्ट महिन्यात पाच दिवस, सप्टेंबर महिन्यात सहा दिवसांची नोंद करण्यात करण्यात आली आहे. सर्वाधिक उंच लाटा दि. २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १.०३ वाजता उसळणार असून यावेळी लाटांची उंची ४.८४ मी. इतकी असेल. दरम्यान, मोठ्या भरतीच्या वेळी अनुषंगाने पालिकेकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.


इतर महत्त्वाची कामे

१. अंधेरी सबवेतील पूरस्थिती टळणार - दरवर्षी पावसाळ्यात मोगरा नाल्याच्या पाण्यामुळे अंधेरी सबवे परिसर, जोगेश्वरी, वर्सोवा येथे पूरस्थिती उद्भवते. यातून सुटका करण्यासाठी मोगरा नाल्यावर विविध कामे केली जाणार आहेत. त्याला रु. २०९ कोटी खर्च येणार आहे व ही कामे पूर्ण व्हायला तीन वर्षे लागणार आहेत. अंधेरी सबवेलगत रेल्वेमार्गाखालून ही वाहिनी सहा मी. रुंद व अडीच मी. खोल टाकण्यात येणार आहे.

२. पूर्व उपनगरातील काही मोठ्या नाल्यांची पुनर्बांधणी होणार आहे. पालिकेकडून ५४ कोटींचा निधी.

३. मिठी नदीवर विकास प्रकल्प

पहिला टप्पा - फिल्टर पाडा ते डब्ल्यूएसपी कंपाऊंड दरम्यानची विकासकामे. खर्च १३३ कोटी. कामे पूर्ण.

दुसरा टप्पा - पवईला सीएसएमटी रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे व मलनिस्सारण कामे. खर्च ५७० कोटी. कामे सुरू.

तिसरा टप्पा - सीएसएमटी रोड, कुर्ला ते माहीम कॉजवे दरम्यान संरक्षक भिंत. सेवारस्ता, फ्लडगेट बांधणे. खर्च १,९५० कोटी अपूर्ण राहिलेली कामे करणार.

चौथा टप्पा - बापट नाला ते सफेद पूल नाला ते धारावी ते मलजल प्रक्रियाकेंद्र येथील बोगद्याचे काम. खर्च ४५५ कोटी. काम प्रगतीपथावर.

तेव्हा, एकूणच काय तर प्रशासनाने आपल्या परिने मान्सूनसाठी यंत्रणा सज्ज केली आहे. पण, आता मुंबईला प्रतीक्षा आहे ती मुसळधार पावसाची.अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.