गोखले पुल ४ जुलै रोजी वाहतुकीस खुला होणार

02 Jul 2024 12:39:56

gokhale bridge


मुंबई, दि.२:
अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशतः उचलून तो गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. तसेच, या पूलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका जोडण्‍यासंदर्भातील सर्व कामेही पूर्ण करण्‍यात आली आहेत. वाहतूक व्‍यवस्‍थापनासंबंधित कामे आणि चाचण्‍या पूर्ण करून गुरूवार, दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ५ हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. रविवार, दि. ३० जून रोजी रात्री उशिरा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेने (व्हिजेटीआय) महानगरपालिका प्रशासनास वाहतूक सुरू करण्‍यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे करण्यात आली. याअंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुस-या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या कामासाठी ७८ दिवसांचा कालावधी लागला.

तर 'काँक्रिट क्यूरींग'च्या कामासाठी आवश्यक १४ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. क्यूरिंगसोबतच समांतर अशा पद्धतीने जोडणी सांध्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर पुलावर विशिष्ट तासांच्या कालावधीत 'लोड टेस्ट' करण्यात आली. पुलांवर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते काम यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार पूर्ण करण्यात आले आहे. या पुलावर जुहू पासून अंधेरी असा पश्चिम- पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्‍ट्रक्‍चरली सेफ) असल्‍याचे 'व्हिजेटीआय' मार्फत घोषित करण्‍यात आले आहे. आवश्यक त्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या मार्गिकेवर वाहतूक सुरू करण्‍याबाबतचे 'ना हरकत प्रमाणपत्र' 'व्हिजेटीआय'ने बीएमसीला दिले आहे.

हलक्या वाहनांनाच पुलावर प्रवेश

गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
सी. डी. बर्फीवाला पूल सुस्थितीत स्थिर

सी. डी. बर्फीवाला या पुलासाठी देण्यात आलेला तात्पुरत्या स्वरूपाचा जॅकचा आधार काढण्यात आला आहे. त्यामुळे बर्फीवाला पूल पूर्णपणे खांबांच्या आधारावर स्थित आणि सुस्थितीत असल्याची माहिती पूल विभागाने दिली आहे. तसेच पी ११ या खांबाच्या ठिकाणी पूल उचललेल्या ठिकाणी पुलास भक्कम आधार देण्यात आला आहे. याचाच अर्थ कोणताही तात्पुरता आधार पुलाला देण्यात आलेला नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0