हरित वसुंधरेची समृद्ध ‘संध्या’काळ

19 Jul 2024 21:05:03
sandhya milakhe

प्रदूषणामुळे पृथ्वीचा वाढत चाललेला असमतोल सुधारण्यासाठी आणि प्राणवायू वाचवण्यासाठी झाडे लावून सृष्टीचे रक्षण करणार्‍या समाजसेविका संध्या मिलखे यांच्याविषयी...

महाराष्ट्राच्या मातीमध्ये उगवलेले हजारो अंकुर पुढे महाकाय वटवृक्ष म्हणून बहरले. या वृक्षांच्या सावलीत पुढच्या अनेक पिढ्या पोसल्या गेल्या आणि समृद्धही झाल्या. या समृद्ध झालेल्या पिढीतील एक हिरकणी म्हणजे संध्या मंगेश मिलखे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अगदीच छोटेसे खेडे असलेल्या सोमज येथे 1989 साली संध्या यांचा जन्म झाला. आई दुसरी उत्तीर्ण, तर वडिलांचे शिक्षण दहावीपर्यंत. संध्या यांचे वडील ‘भारत पेट्रोलियम’ कंपनीत नोकरीला होते. नोकरीनिमित्त वडिलांची बदली ठाण्याला झाली. येथेच संध्या आणि त्यांच्या भावंडांचे शिक्षणही पूर्ण झाले. स्वतःचे शिक्षण कमी असल्याने आईवडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते. म्हणूनच त्यांनी चारही मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ दिली नाही. कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, याची नेहमी काळजी घेतली.

आईवडिलांकडून शिक्षणावर जास्त भर दिला गेल्याने स्वतः संध्या या पदवीधर झाल्या. एवढेच नाही तर 2012 साली त्यांनी एम. कॉम.पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. त्यांचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनिअर, एक बहीण बायोमेडिकल इंजिनिअर, तर दुसरी बहीण इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर आहे. वडील जरी नोकरीनिमित्त बाहेरगावी असले, तरी त्यांना शेतीची आणि समाजसेवेची आवड होती. वडिलांचा हाच गुण संध्या यांच्यात उतरला असून, त्यांनीही समाजसेवेचे व्रत अंगीकारले. जसा वेळ मिळेल, तसा त्या काही छोटे-मोठे सामाजिक उपक्रम राबवित असत. मात्र, कोरोनाच्या महामारीनंतर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. या महामारीमध्ये त्यांनी आपल्या सासर्‍यांना गमावले. या घटनेने त्यांच्यामध्ये आंतर्बाह्य बदल झाला. आपल्या सासर्‍यांची ओळख पुसली जाऊ नये, म्हणून संध्या यांनी 2021 साली ‘सानि फाऊंडेशन’ या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली.

त्यांच्या सासूबाई यांच्या ‘सावित्री’ या नावामधले ‘सा’ आणि सासर्‍यांच्या ‘निवृत्ती’ नावातील ‘नि’ असे आद्यक्षर मिळून ‘सानि फाऊंडेशन’ हे नाव ठेवल्याचे त्या सांगतात. सासर्‍यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेमार्फत तीन वर्षांत अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले गेले. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक असे विविध उपक्रम संध्या राबवितात. यातलाच एक विशेष आणि संध्या मिलखे यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात त्यांनी आंबा, वड, पिंपळ, बांबू, चिंच, आवळा, नारळ अशी देशी प्रजातींच्या 200 वृक्षांची लागवड केली. ही झाडे लावण्यात आलेली जागा आधी पूर्ण डोंगराळ आणि काट्याकुट्यांची होती. त्याचे आठ दिवस जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरण करण्यात आले.

तसेच, पूर्ण गवत काढून झाडे लावण्यायोग्य करण्यात आली. त्यानंतर 12 फुटांच्या अंतरावर तीन फूट रुंद आणि तीन फूट खोल खड्डे करण्यात आले. त्यामध्ये शेणखत आणि लिंबोळी खत एकत्र करून झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांनी जीव धरला असून, पुढे जाऊन वसुंधरेला हिरवे लेणे देण्यासाठी अनेक प्रकल्प राबविण्याचा संध्या यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे, शहरी भागासह ग्रामीण भागामधील माळरानावर प्राणवायूचे छोटे छोटे भाग तयार करण्याचा ‘सानि फाऊंडेशन’चा प्रयत्न असल्याचे त्या सांगतात आणि याचाच एक भाग म्हणून ओसाड माळरानावर वृक्षलागवड करून भविष्यात वनराई प्रकल्प ‘सानि फाऊंडेशन’कडून राबविले जाणार असल्याचे संध्या यांनी सांगितले. तसेच, अजून एक वेगळी कल्पना योजून या लावलेल्या प्रत्येक झाडाला संध्या यांनी एका व्यक्तीचे नाव दिले आहे. नाव दिलेली व्यक्तीच या झाडांची देखभाल करणार असल्याने प्रत्येकाकडून निसर्गाची काळजी घेतली जावी, हा मुख्य उद्देश असल्याचे संध्या यांचे म्हणणे. आपली सामाजिक बांधिलकी पुढे जोपासत संध्या यांनी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या चिंचलेखैरे या गावातील आदिवासी शाळेतील मुलांना मोफत टी-शर्टवाटप केले आहे. त्याचप्रमाणे, एसएमबीटी धामणगाव येथील विद्यार्थ्यांना कपडे दिले, तर ‘केएफएल’ या फुटबॉल खेळणार्‍या मुलांच्या संघाला खेळण्यासाठी टी-शर्ट देण्यात आले.

संध्या यांना या समाजकार्यात त्यांचे पती मंगेश मिलखे यांचीदेखील मोलाची साथ लाभली आहे. मंगेश हे उच्च पदावर कार्यरत असून वेळोवेळी, गरज असेल तेव्हा ते संध्या यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतात. लग्नानंतर संध्या यांचे थांबलेले शिक्षणदेखील मंगेश मिलखे यांनी पुढे सुरू ठेवून त्यांना एम. कॉम.ची पदवी पूर्ण करावयास सांगितले. मंगेश नेहमी सांगतात, “सगळे व्यवस्थित होईल, मी आहे ना.” त्यांच्या ‘आहे ना’ या शब्दात किती ताकद असल्याचे सांगताना संध्या यांच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. मंगेश यांच्या ताकदीच्या आधारे सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी धडपडणार्‍या संध्या मिलखे यांच्या समाजसेवेसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...


विराम गांगुर्डे
9404687608
Powered By Sangraha 9.0