विशाळगड अतिक्रमणाबाबत नियमबाह्य कारवाई नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

18 Jul 2024 21:14:30
vishalgad ajit pawar visited
 

कोल्हापूर :     किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक पीडितांशी संवाद साधत अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरुन परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या नुकसानाबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

दरम्यान, पीडितांना तातडीची मदतही शासनाकडून देण्यात आली असून विशाळगड अतिक्रमणाच्याबाबतीत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पीडितांना सांगितले. मुसलमानवाडी येथे विशाळगडावरील काही नागरिक व महिला आल्या होत्या. त्यांना सद्या विशाळगडावरील फक्त व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत, न्यायप्रविष्ट अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यावेळी सोबत आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या संदर्भात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं. सर्व शांततेने घ्या, तुमची काय मागणी असेल याबद्दल सरकार कायद्यांनी, नियमांनी सकारात्मक असेल. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही, कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत बसून आपण मार्ग काढू, असेदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामस्थांना सांगितले.

विशाळगडावरील जी अतिक्रमणे आहेत, जी न्यायप्रविष्ट आहेत, तसेच मुंबई हायकोर्टामध्ये त्याविषयी काही केसेस सुरु आहेत, तसेच कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पध्दतीचा मार्ग या ठिकाणी काढला जाईल असे त्यांना सांगितले होते. घटनेचे संपूर्ण व्हिडीओ पोलीसांनी काढलेले आहेत, कोण त्याच्यामध्ये काय करतय, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतय या सगळ्या गोष्टींची संपूर्ण शहानिशा केली जाईल आणि त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.


राज्यामध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये
 
राज्य सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. चुकीच्या गोष्टींच समर्थन सरकार करणार नाही. अशा प्रकारचे गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी दरवर्षी शासन निधी देत असते. अशा शिवकालीन किल्ल्यांवर अतिक्रमण होऊ नये, अशी मागणी शिवप्रेमी व इतिहास अभ्यासकांची असून समाजा-समाजामध्ये फूट पडेल, कारण नसताना जातीय सलोखा बिघडेल आणि त्याच्यामधून राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी, संघटनांनी तसेच नेते मंडळींनी करु नये असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.



Powered By Sangraha 9.0