जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा समन्वयातून मार्ग काढावा!

18 Jul 2024 16:08:06
pravin darekar on jarange stand


मुंबई :        राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे यांनी साथ देऊन शांततेत चर्चेच्या मार्गातून मराठा समाजाला न्याय द्यावा, असा सल्ला भाजप गटनेते तथा विधानपरिषद आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. उगाच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा चर्चेतून, समन्वयातून मार्ग काढण्याची भुमिका घ्यावी, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत तो डाव मी मोडणार अशा प्रकारचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे यांची सुरुवातच आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट हाच आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. अशा प्रकारची वक्तव्य करायला जरांगेंना कुणीतरी फ्रिडींग देतेय का हे तपासण्याची गरज आहे, असे दरेकरांनी यावेळी म्हटले आहे.




दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विश्वास असून त्यांनी मराठ्यांना आरक्षण देऊन टिकविले. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या हिताच्या अनेक योजना, सवलती आणल्या. आताही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण दिलेले आहे. सगेसोयऱ्यांचा मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. त्यामुळे सगेसोयऱ्याच्या विषयावर चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे सांगतानाच समाज बरोबर आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारचे टार्गेट करणे योग्य नाही हे जरांगेंनी समजून घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच महायुती सरकारकडून महाराष्ट्रातील उपेक्षित समाजासाठी अनेक योजना आणून न्याय देण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्याचा अजेंडा आपण राबवताय की काय? विरोधी पक्षाचा अजेंडा आपण राबवताय की काय? फडणवीसांच्या विरोधातील ज्या काही शक्ती आहेत त्यांचा अजेंडा आपल्या मार्फत राबविला जातोय की काय? अशा प्रकारचा संशय येत असल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आणि कर्तव्य त्यांचे आहे. ते राज्य रक्तरंजित कसे होऊ देतील. ते रक्तरंजित होऊ नये यासाठीच त्यांचा अट्टाहास असल्याचेही दरेकर म्हणाले.

Powered By Sangraha 9.0