गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वढलापेठ येथे 'सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या शुभमुर्हूर्तावर भूमिपूजन केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित गडचिरोलीवासीयांना संबोधित करताना आषाढी एकादशीच्या शुभदिनी हा भूमिपूजन समारंभ होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ४० वर्षांपूर्वी १९८४ साली याच भागामध्ये माओवाद्यांचे सर्वात मोठे अधिवेशन झाले होते. यानंतर माओवादाने ग्रस्त हा जिल्हा विकासामध्ये मागे पडत राहिला. आज त्याच ठिकाणी, सामान्य आदिवासी आणि दलित बांधवांच्या हाताला काम देण्यासाठी उभा राहणारा हा प्रकल्प सर्वार्थाने ऐतिहासिक असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
,दरम्यान, सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड'मार्फत गडचिरोलीमध्ये सुमारे १० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे, प्रकल्पाच्या माध्यमातून ७ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून येत्या काळात या प्रकल्पाची 'फिनिश्ड (तयार) स्टील' उत्पादनाची क्षमता ८ दशलक्ष टन इतकी होणार आहे. यापूर्वी लॉईड्सने केलेल्या गुंतवणुकीतून ४ दशलक्ष टन इतकी क्षमता उभी राहिली होती. या दोन्ही प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या एकूण फिनिश्ड स्टील उत्पादनात ३० टक्के वाटा हा एकट्या गडचिरोलीचा असणार आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या १० वर्षात गडचिरोलीची विकासाच्या दिशेने झालेली वाटचाल ऐतिहासिक असून येत्या काळात चामोर्शीला देखील ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून २० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. चामोर्शी ते काकीनाडा बंदरापर्यंत जलमार्ग महत्त्वाकांक्षी योजनेवर काम सुरू आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. विकासकामे होत असताना स्थानिक ठाकूर देवाच्या आसपास कोणतेही मायनिंग होणार नाही, आदिवासी बांधवांच्या आराध्य दैवताला नखभर देखील धक्का पोहचू देणार नाही, हा माझा शब्द आहे, अशी ग्वाहीदेखील फडणवीसांनी स्थानिकांना दिली आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री उदय सामंत, मंत्री धर्मराव बाबा आत्राम, सुरजागड प्रकल्पाचे अध्यक्ष वेदांत जोशी तसेच संबंधित अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.