आदिवासी समाजाच्या विकासासाठी पुढे या!

18 Jul 2024 20:56:15
dr mohanji bhagwat adivasi samaj

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :     "आदिवासी समाज आजही विकासाच्या दृष्टीने विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मागे आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या प्रभावशाली लोकांनी यामध्ये पुढे येऊन सहकार्य करावे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील बिष्णुपूर येथे दि. १८ जुलै रोजी विकास भारतीतर्फे आयोजित ग्राम विकास परिषदेत संघटनेशी संबंधित लोकांना संबोधित केले.

आदिवासी समाजाच्या विकासाबाबत चर्चा करताना ते म्हणाले की, बाथू जमाती विकासात नक्कीच मागे आहे, परंतु ते शांतताप्रिय आणि प्रामाणिक आहेत. आपण त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकतो. आपण आदिवासी समाजासाठी काम करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो असे नाही. इतरांची सेवा करताना आपलाही विकास होत असतो. मोह आणि आकर्षणात न पडता मनुष्याला काम करावे लागते. समाजात जे काही चांगलं घडतं ते वाईटापेक्षा चाळीस पटीने चांगलं असतं. समाज निरोगी राहिला तर देशाचीही प्रगती होईल."

पुढे ते म्हणाले, "विकासाला अंत नाही. आपण जे काही करतो ते सतत करत राहायचे असते. कामात पुढे जाताना स्वतःचा मूळ स्वभाव बदलू नये. लोकांच्या शिक्षणाची, आरोग्याची, पर्यावरणाची काळजी करत राहायला हवे. एक चांगले जग निर्माण करण्यासाठी, आपण चांगले मानव बनवण्यासाठी एकत्र काम करत आहोत." सरसंघचालकांनी यावेळी विकास भारतीच्या परिसरात कल्पतरूचे झाड लावून वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली.




Powered By Sangraha 9.0