मागील दशकात जागतिक अर्थकारणात आणि उद्योगक्षेत्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे एलॉन मस्क. अफलातून कल्पना, व्यवसायात जोखीम घेण्याची सवय यामुळे मस्क यांनी अल्पावधीतच ‘स्पेसएक्स’, ‘टेस्ला’ यांसह अनेक कंपन्यांना अग्रगण्य स्थान मिळवून दिले. पण, आता मस्कच्या ‘टेस्ला’चा बाजार उठायला लागला आहे. त्यामुळेच ‘ईव्ही’च्या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करणार्याकडे वाटचाल करणार्या ‘टेस्ला’ची गाडी नेमकी कुठे अडकली, हे पाहणे उत्सुकतेचे ठरावे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, खनिज तेलाच्या उत्सर्जनातून निर्माण होणारा हरित वायू आणि त्यातून वसुंधरेचे वाढणारे तापमान, या कारणांमुळे जगभरात वाहतुकीसाठी पर्यायी ऊर्जास्रोत शोधण्यास सुरुवात झाली. यातूनच इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) म्हणजेच विजेवर चालणार्या गाड्यांचा पर्याय समोर आला. पण, या गाड्यांना रस्त्यावर उतरणे मात्र अवघड होते. पण, हे काम सहज शक्य करून दाखवले, ते एलॉन मस्कच्या ‘टेस्ला’ या कंपनीने. ही तीच ‘टेस्ला’ कंपनी, ज्यांनी 2008 साली पहिली इलेक्ट्रिक चारचाकी गाडी बाजारपेठेत आणली. प्रारंभीपासूनच विजेवर चालणार्या गाड्यांवर ‘टेस्ला’ने लक्ष केंद्रित केले. गाड्यांच्या उत्पादनाबरोबरच ‘टेस्ला’ने चार्जिंग स्टेशन उभारण्यावरसुद्धा भर दिला. याचा फायदा ‘टेस्ला’ला साहजिकच झाला.
अमेरिका आणि काही पाश्चिमात्य देशांमध्ये ‘टेस्ला’ला चांगली मागणी आली. त्यासोबतच भारतासारखे देशातील ग्राहकसुद्धा ‘टेस्ला तुम कब आओगे?’ असा प्रश्न विचारत होते. आकर्षक डिझाईन, उच्च कोटीचे तंत्रज्ञान, एलॉन मस्क यांच्यासारखा मोफत मिळालेला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर यामुळे ‘टेस्ला’ने अल्पावधीतच मोठी मजल मारली. बाजारातील आघाडीच्या कारउत्पादक कंपन्यांना मागे टाकत ‘टेस्ला’ने ईव्ही बाजारपेठेत आपले वर्चस्व निर्माण केले. पण, जगातील एकूण चारचाकींच्या उत्पादनात विजेवर चालणार्या गाड्यांचे उत्पादन अवघे 1.3 टक्क्यांच्या आसपास आहे. या बाजारपेठेत ‘टेस्ला’ गेल्या वर्षापर्यंत पहिल्या क्रमांकावर असली, तरी यामध्ये ‘टेस्ला’चा शेअर हा 20 टक्क्यांहूनही कमी आहे. म्हणजेच ‘टेस्ला’ जागतिक पातळीवर चारचाकी गाड्यांच्या बाजारपेठेत विक्री आणि उत्पादनाच्या बाबतीत एक लहान खेळाडू आहे.
पण, शेअर बाजारातील ‘मार्केट व्हॅल्यू’चा विचार केल्यास, मस्क यांची ‘टेस्ला’ जगातील सर्वात मोठी कारउत्पादक कंपनी. कोरोना काळात संपूर्ण जगभरातील शेअर बाजार घसरत असताना, मस्क यांच्या ‘टेस्ला’ने ‘मार्केट व्हॅल्यू’मध्ये एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला. एकवेळ तर कंपनीची ‘मार्केट व्हॅल्यू’ 1.23 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली होती. गुंतवणुकदारांनी ‘टेस्ला’वर दाखवलेल्या या विश्वासाचे एकमेव कारण होते, ते म्हणजे मस्क यांची प्रतिमा. गुंतवणुकदारांसाठी मस्क हे विश्वासाचे दुसरे नाव. मस्क हे ‘टेस्ला’चे कार्यकारी अधिकारी असले, तरी त्यांचे मागच्या काही वर्षांतील मुख्य काम हे ‘एक्स’ (पूर्वीचे ‘ट्विटर’) या समाजमाध्यमांवर जगात घडणार्या कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देणे हेच राहिले आहे. याच ‘ट्विटर’च्या माध्यमातून ‘टेस्ला’च्या शेअरच्या भावात चढ-उतार घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पण, या आरोपांचा त्यांच्या प्रतिमेवर काहीही परिणाम झालेला दिसत नाहीत. त्यांचे चाहते आणि मस्क यांनी दाखवलेल्या स्वप्नावर विश्वास ठेवणार्या गुंतवणुकदारांनी ‘टेस्ला’मध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे ‘टेस्ला’ची गत ही ’मोठे घर पोकळ वासा’ या म्हणीप्रमाणे झाली आहे.
पण, आता मस्कच्या ‘टेस्ला’ची वास्तविकता सर्वांसमोर येत आहे. ट्रिलियनमध्ये ‘मार्केट व्हॅल्यू’ पोहोचलेली ‘टेस्ला’ आता अर्ध्यावर आली आहे. ‘टेस्ला’ची ‘मार्केट व्हॅल्यू’ आता 500 ते 600 अब्ज डॉलर्सच्या मध्ये आहे. ‘टेस्ला’ची ही दुरवस्था फक्त शेअर बाजारात झाली असे नाही, तर ज्या तंत्रज्ञानासाठी ‘टेस्ला’ ओळखली जात होती, तिथेसुद्धा कंपनीच्या गाड्या ‘फुसका बार’ ठरत आहेत. 2019 साली ‘टेस्ला’ने मोठा गाजावाजा करून सायबर ट्रक बाजारात उतरवला होता. पण, या सायबर ट्रकचे पार्ट्स वेगळे झाले. ही गाडी सुरक्षा मानक पूर्ण करण्यात अपयशी ठरली. त्यासोबतच कंपनीच्या इतर कार मॉडे्ल्समध्ये तांत्रिक समस्या आल्याने कंपनीला त्यांना आपल्या गाड्या दुरुस्तीसाठी परत मागाव्या लागल्या. त्यामुळे ‘टेस्ला’च्या ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ला मोठे नुकसान झाले. याचा फटका कंपनीच्या विक्रीवरसुद्धा झाला. 2024च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत 13 टक्क्यांची घट झाली.
‘टेस्ला’च्या मागणीत आलेल्या कमीमुळे उत्पादित झालेल्या गाड्यांच्या पार्किंगसाठी कंपनीला वेगळी व्यवस्था करावी लागत आहे. ‘टेस्ला’ची आणखी एक सर्वात मोठी समस्या म्हणजे, ‘टेस्ला’चे अमेरिकेच्या बाजारपेठेवर असलेले अतिरिक्त अवलंबित्व. एका अंदाजानुसार, ‘टेस्ला’च्या एक तृतीयांश गाड्यांची विक्री अमेरिकेच्या बाजारपेठेत होते. अमेरिकेनंतर, मस्क यांना सर्वात मोठी संधी ही चीनच्या बाजारपेठेत दिसली. पण, प्रत्येक चांगल्या वस्तूची ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करून स्वस्तात बनवण्यात महारत असलेल्या चीनमध्ये ‘टेस्ला’ला आता तगडे आव्हान मिळत आहे. मस्क यांनी चीनच्या डाव्या सरकारला खूश करण्यासाठी चीनमध्ये उत्पादन करण्यास सुरुवात केली. पण, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. चीनच्या ‘बीवायडी’ या कंपनीने फक्त चीनमध्येच नाही, तर जागतिक पातळीवर ईव्हीविक्रीत ‘टेस्ला’ला मागे टाकले.
चीनमध्ये अपेक्षित यश मिळत नसल्याने मस्क यांनी भारतावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. भारत सरकारनेसुद्धा मस्क यांच्या ‘टेस्ला’च्या गुंतवणुकीविषयी सकारात्मकता दर्शवली होती. पण, चीनने डोळे वटारल्यानंतर मस्क यांनी भारतात गुंतवणूक करताना हात आखडता घेतला. मस्क यांच्यासाठी चीन आज ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ या मराठी म्हणीप्रमाणे झाले आहे. यातून निघण्यासाठी मस्क यांना काही आक्रमक पाऊले उचलावी लागतील, नाहीतर मस्क यांची ‘टेस्ला’ इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही.