मुंबई : गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर खरेदी करत आपल्या हक्काची घरं घेतली. यात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अदिती द्रविड, अश्विनी महांगडे, रुपाली भोसले यांची नावं नक्कीच येतात. या सगळ्यांच्या सोबतीने ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिनेता अक्षय केळकरची सुद्धा काही दिवसांपूर्वीच हक्काचं घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण झाली. दरम्यान, अक्षयने त्याच्या घरात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक विशेष गोष्ट केली असून त्याची पोस्ट देखील त्याने शेअर केली आहे.
अक्षयने या नव्या घरात त्याने वारकऱ्यांच्या प्रतिकृती घडवल्या आहेत. याची झलक आज आषाढी एकादशी निमित्ताने अभिनेत्याने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अक्षय केळकरने हातात पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी, वारीत सहभागी झालेली लहान मुलं अशा विविध प्रतिकृती घडवल्या आहेत. त्याने घरात स्वत:च्या हाताने ‘माझी पंढरी’ असं भिंतीवर लिहिल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अक्षयने पोस्ट केली आहे की, ‘जेव्हा या देवळ्या बनवल्या तेव्हा सुरुवातीला माहीत नव्हतं इथे मी नेमकं काय ठेवणार आहे… खूप गोष्टींचा विचार केला होता पण, इथे दैवी गोष्टच यायची होती. माझ्या घरासाठी आलेलं हे एक सुंदर गिफ्ट! तेही माझ्या नव्या शेजाऱ्यांकडून… कलाकार माणूस भेटला. धन्यावाद @abhijit.music08 सर तुमचे खूप खूप आभार!
या इतक्या सुंदर वारकऱ्यांच्या Idols साठी. माझी पंढरी सजली आणि तुमच्यामुळे इतकी सुंदर सजली. विशेष म्हणजे हे सुंदर वारकरी अभिजीत सरांनी स्वतः बनवलेले आहेत. त्यामुळे, this set is one and only! So, हे आता फक्त माझ्याकडेच आहेत. Trust me, ही श्रीमंतीच वेगळी आहे! माझ्या नव्या घरासाठी मिळालेलं सर्वात सुंदर गिफ्ट…
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या नव्या घराचे शेजारी अतिशय हुशार आणि खूप दमदार कलाकार आहेत. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार!