ठाणे:-विविध मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या सीम विक्री करणाऱ्या एजंटाच्या माध्यमातून दुसऱ्याच्या नावाचे सिमकार्ड घेऊन देश विदेशात शेअर ट्रेडींग व तत्सम आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड ठाणे पोलीसांच्या सायबर शाखेने केला आहे. पोलिसांनी अटक त्रिकुटाकडुन ७७९ बोगस सीमकार्ड ' ५० डेबिट-क्रेडीट कार्ड व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. आतापर्यंत ३ हजार बोगस सिमकार्डचा वापर करीत हे टोळके परराज्यातून आणि विदेशातून हा गोरखधंदा चालवीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सायबर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालयात वर्षभरात शेअर ट्रेडींग फसवणुकीचे १६ गुन्हे दाखल झाले आहेत. तर चितळसर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अज्ञात आरोपीनी तक्रारदारांना मोबाईलवर एक लिंक पाठवून शेअर गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवून २९ लाख ३० हजाराचा गंडा घातला होता. या गुन्ह्याच्या तपासात गुन्हेगारांची इको सिस्टीम असलेल्या बोगस "सिमकार्ड" चा उलगडा झाला.
तपासात मोबाईल क्रमांक ज्या हॅण्डन्सेटमध्ये वापरात आला त्याच्या आयएमईआयच्या तांत्रिक विश्लेषणात सदर मोबाईल छत्तीसगड येथे वापरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर छापेमारी करून आरोपी आफताब इरशाद ढेबर (२२), मनिषकुमार देशमुख (२७) दोघेही रा. छत्तीसगढ आणि सिमकार्ड पुरविणारा भाईजान उर्भ हाफीज अहमद (४८) रा. उत्तर पूर्व दिल्ली याला १६ जुलै रोजी रोजी ११ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात नेले असता १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीमकार्ड खरेदी करताना ग्राहकाचा थंंब इंप्रेशन पुन्हा पुन्हा घेऊन हे बोगस सीम कार्ड मिळवत. ही टोळी भारतात सीम कार्ड खरेदी करून दुबई येथुन आर्थिक फसवणुकीसाठी वापर करीत असल्याचे तपासात समोर आले असुन आजपर्यत ३ हजार बोगस सीम कार्डचा गैरवापर झाल्याचा दावा उपायुक्त मणेरे यांनी केला.
सायबर गुन्हेगार हे दोन प्रकारे गुन्हे करतात. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. तुमचे पार्सल आले, लिंक पाठविणे असे घाबरविणे आणि दुसरे नफ्याचे आमिष दाखवून फसवितात. तेव्हा नागरिकांनी अशा कुठल्याही अमिषाला बळी पडू नये, अनोळखी लिंक क्लिक करू नये, आपले ओटीपी कुणालाही शेअर करू नये.
- पराग मणेरे ( पोलीस उपायुक्त सायबर,आर्थिक गुन्हे शाखा)