मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा संपन्न

17 Jul 2024 10:22:55

Eknath Shinde Pandharpur

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Eknath Shinde Pandharpur)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवार, दि. १७ जुलै रोजी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करणे हे आपले सौभाग्य असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी या पूजेनंतर व्यक्त केले.

हे वाचलंत का? : पंढरीची वारी " समरसतेचा भक्तिसोहळा

यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचे सांगितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

शासकीय पूजेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0