वंचित बहुजन आघाडी 'आरक्षण बचाव जनयात्रा' काढणार

16 Jul 2024 19:43:24

vanchit aaghadi

मुंबई : राज्यातील एसी, एसटी आणि ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव जनयात्रा काढण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवार, दि. १६ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या अनुषंगाने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. हा वाद काय स्वरुप घेईल, याची सर्व ओबीसी संघटना आणि नेत्यांना जाणीव आहे. आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार, ठाकरे गट आणि काँग्रेसचे कोणीही उपस्थित नव्हते. मग राजकीय पक्षांची भूमिका काय? श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत या प्रश्नावर तोडगा निघणार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून विनंती करण्यात आली होती, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिगत सर्वांना पत्र लिहावे. मात्र, अद्याप याबाबतचे पत्र आलेले नाही”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मराठा आणि ओबीसींमधील हा वाद आता फक्त मराठवाड्यापुरता आहे, असे मी मानत नाही. तो आता पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशापर्यंत पसरत चालला आहे. त्यामुळे सर्व ओबीसी संघटनांची एक मागणी होती, की वंचित बहुजन आघाडीने यावर भूमिका मांडावी. ती भूमिका गावोगावी गेली पाहिजे. त्यामुळे आम्ही असे ठरवले आहे, की या सार्वजनिक संघटनांना बरोबर घेऊन दि. २५ जुलै रोजी दादार येथील चैत्यभूमीवरून आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेची सुरुवात केली जाईल. त्याच दिवशी पुण्यातील फुलेवाडा या ठिकाणी जायचे आणि दि. २६ जुलै रोजी पुढच्या वाटेवर निघायचे, असे ठरल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
जनसंवाद यात्रा कुठे कुठे काढणार?
आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्यासह आणखी काही जिल्ह्यांत काढली जाणार आहे. या यात्रेची सांगता दि. ८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येणार आहे. या यात्रेत बैठका आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे, एसटी -एससी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ झाली पाहिजे, आदी मागण्या केल्या जाणार अशल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0