जरांगेंच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका, म्हणाले...

16 Jul 2024 18:56:54
 
Prakash Ambedkar
 
मुंबई : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जहरी टीका केली आहे. सगेसोयरे हे भेसळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, येत्या २५ जुलैपासून ओबीसी, एससी आणि एसटींच्या हक्कासाठी आरक्षण बचाओ यात्रा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजूनही आरक्षणाबाबत भूमिका घेतलेल्या नाहीत. त्यांनी आपली भूमिका घ्यावी, जेणेकरुन ही स्फोटक बनलेली परिस्थिती निवळेल. जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत, ते आपल्या बाजूने नाहीत, असं ओबीसींचं मत होत आहे. हे सगळे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत, असा त्यांचा समज होत असून तो धोकादायक आहे."
 
हे वाचलंत का? -  पटोलेंमुळे पक्षातील अनेक आमदार नाराज! काँग्रेस आमदाराचा आरोप
 
"दुसरीकडे, जरांगे पाटील आमच्या अपेक्षा पुर्ण झालेल्या नाहीत, असं म्हणतात. त्यामुळे जोपर्यंत राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत कुठलंही सरकार भूमिका घेईल असं वाटत नाही. जरांगे श्रीमंत मराठ्यांसोबत आहेत, निवडून आलेल्या ३१ खासदारांसोबत आहेत की, त्यांच्यासोबत मोर्चामध्ये येणाऱ्या गरीब मराठ्यांबरोबर आहे, याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल," असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "सगेसोयरे हे भेसळ आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्या आणि सगेसोयऱ्यांसंबंधी तुमची भूमिका काय? असं पत्र प्रत्येक पक्षाला पाठवायला हवं," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0