‘माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥’ म्हणत आजच्या आषाढी एकादशीच्या तिथीवर पांडुरंगांच्या भक्तीत तल्लीन लाखो वारकर्यांनी पवित्र पंढरीनगरी गाठली. अशी ही पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव. ती केवळ एक धार्मिक गोष्ट नसून, अवघ्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक-सामाजिक जनजागरण आहे. वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या विविध संतांच्या पालख्या आणि भजनी दिंड्या हे भक्तिज्ञानाचे अमृतसिंचन करणार्या मेघमालाच! सामाजिक एकता व समरसतेचे हे दर्शन संतांच्या कार्याची मूर्तीमंत फलश्रुतीच. तेव्हा, आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीची महती आणि संत ज्ञानेश्वरांच्या ‘कानडा ओ विठ्ठलू’ या अभंगाच्या प्रसिद्ध अभंगाचे निरुपण...
भु वैकुंठ श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची प्राचीन परंपरा. हा केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक जनजागरणाचा भक्तिसोहळा. ना ही जत्रा आहे, ना यात्रा आहे, ही वारी आहे. या वारीमागे एक सातत्य आहे आणि आत्मभान आहे. ही वारी भक्तवत्सल विठुमाऊलीची आहे, ही वारी संतांची आहे, ही वारी भक्तभाविक शेतकर्यांची म्हणजे बळीराजाची आहे. समाजातील कष्टकरी विठ्ठलभक्तांची आहे. ही वारी सामूहिक भक्तिसोहळा आहे, व्यापक जनप्रबोधन आहे. वर्ण, जातीभेदविरहित विठ्ठलभक्तांचे पारमार्थिक संमेलन आहे. ‘सर्वांसी येथे आहे अधिकार।’ असा सकल समाजाला मुक्तद्वार असा हा आनंदाचा उत्सव आहे. अद्वैत चैतन्याचे एक विराटदर्शन आहे. देव-भक्तांच्या वार्षिक भेटीचा हा सुखसोहळा अनोखा, अद्भुत, अपूर्व आणि एकमेवाद्वितीय आहे. शेकडो वर्षे, विनाखंड, विनानिमंत्रण चालत आलेला हा भक्तिसोहळा महाराष्ट्राचे, मराठी संस्कृतीचे परम वैभव आहे.
पंढरपूर हे संतांचे व विठ्ठलभक्त वारकर्यांचे ‘माहेर’. ‘माझे माहेर पंढरी।’ हा संत एकनाथांचा अभंग सुप्रसिद्ध आहे. चंद्रभागेच्या तिरावर गेली २८ युगे विटेवर उभा असलेला पांडुरंग-विठ्ठल, ही वारकर्यांची इष्टदेवता आहेच, पण त्यापेक्षाही अधिक ती वारकर्याची माऊली आहे, विठुमाऊली! आईच्या भेटीला मुले जशी दुडूदुडू धावत जातात, तशाच अनिवार ओढीने दरवर्षी ऊनपावसाची तमा न बाळगता, लाखो वारकरी आषाढीला विठुमाऊलीकडे धाव घेतात. त्यांना ना खाण्याची, ना पाण्याची, ना राहाण्याची, ना शेकडो मैल चालत जाण्याच्या कष्टांची पर्वा असते. ‘माझे जीवीची आवडी। पंढरपूरा नेईन गुढी।’ अशा जीवीच्या आवडीने खाद्यांवर भगवी पताका आणि हाती टाळ घेऊन अभंग गाण्यात देहभान विसरून ते पंढरीची स्वानंद सुखाने पायी वाटचाल करीत असतात.
पंढरीची वारी ही पिढ्यान्पिढ्या करणारी हजारो घराणी महाराष्ट्रात आहेत. संत ज्ञानेश्वरांचे वडील हे पंढरीचे वारकरी होते. संत तुकोबांचे पूर्वज पंढरीचे वारकरी होते, म्हणून संतांनी आपल्या घराण्यात चालत आलेल्या पंढरीच्या वारीचा स्वाभिमानपूर्वक सार्थ अभंग गौरव केलेला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात,
पंढरीची वारी आहे माझे घरी। आणि न करी तीर्थव्रत॥
व्रत एकादशी करीन उपवास।
गाईन अहर्निश मुखे नाम॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे। बीज कल्पांतीचे तुका म्हणे॥
सामाजिक समरसतेचे विराट दर्शन
श्रीक्षेत्र पंढरपूरला दरवर्षी (एका वर्षात) चार वार्या होतात. ‘आषाढी वारी’, ‘कार्तिक वारी’, ‘माघ वारी’ आणि ‘चैत्र वारी‘ अशा चार वार्यांपैकी ‘आषाढी वारी’ व ‘कार्तिक वारी’ यांना मोठ्या वार्या म्हणतात. कारण, या दोन वार्यांचे महत्त्व म्हणजे विठ्ठलच संतांना व भाविकांना आषाढी व कार्तिकीला ‘मला विसरू नका’ असे म्हणतो. संत नामदेवांचा त्याविषयी सुंदर अभंग आहे -
आषाढी, कार्तिकी विसरू नका मज।
सांगतसे गुज पांडुरंग॥
आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या शेकडो गावांतून अनेक संतांच्या पालख्या घेऊन असंख्य दिंड्या टाळमृदुंगाच्या साथीने अभंग गात गात पायी पंढरपूरला येतात. वर्हाड, विदर्भ, खानदेश, कोकण, मुंबई अशा सर्व विभागांतून विविध संतांच्या दिंड्या भजने गात, हरीनामाचा जयघोष करीत १८ ते २० दिवस चालत पंढरपूरला येतात. शेगांवच्या संत गजानन महाराज दिंडीला तब्बल ३० दिवस चालत वाटचाल करावी लागते. त्या दिंडीत शेकडो तरुण वारकरी सहभागी असतात.
पंढरीची वारी संत निवृत्ती ज्ञानदेव यांच्या आधीपासूनची आहे. संत ज्ञानदेवांनी त्याला संघटित स्वरुप दिले आणि पूर्वपरंपरा जोमाने वृद्धिंगत केली.सकल समाजातील वेदवंचित, उपेक्षित घटकांना, भेदाभेदाच्या भिंती पाडून संत ज्ञानदेव, नामदेवांनी पारमार्थिक समतेच्या ध्वजाखाली, पंढरपूरच्या वाळवंटी एक केले. सर्वांना नामभक्तीचा-नामस्मरणाचा अत्यंत सोपा, सुलभ ‘राम कृष्ण हरी’ नाममंत्र देऊन, आजवर धर्ममार्तंडांनी ज्या वेदवंचित घटकांची उपेक्षा केली, त्यांना स्वाभिमानानी स्वत्वाचे भान देत विठ्ठलभक्तिपंथामध्ये अग्रेसर केले.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥
हा संत तुकोबांचा अभंग वारकरी भक्तिपंथाच्या सामाजिक समता-समरतेचा जाहीरनामाच आहे. या भक्तिपंथात कोणकोणत्या जाती-वर्णांत जन्मला, त्याला महत्त्वच नाही, तर कोणाच्या मनात कशा प्रकारची भक्ती आहे, हे महत्त्वाचे. ‘भक्ती येथ प्रमाण।’ असे संत ज्ञानदेवांचे वचन प्रसिद्ध आहे.
वर्ण अभिमाने कोण झाले पावन।
ऐसे द्या सांगून मजपाशी॥
- नामदेव
यातायाती धर्म नाही विष्णुदासा।
निर्णय हा ऐसा वेदशास्त्री॥
- तुकोबा
नाही याती कुळ उचनीच भेद।
भाव एक शुद्ध पाहातसे॥
- नामदेव
ही संतवचने केवळ सुभाषित नाहीत, तर वारकर्याचा, विठ्ठलभक्तांचा आचारधर्म आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातील ठिकठिकाणांहून जाणार्या वारकरी दिंड्यांमध्ये ही सामाजिक समता - समरसता पाहू शकतो, अनुभवू शकतो. दिंड्यांमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. हेच वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
भक्तिज्ञानाचे अमृतसिंचन
आषाढी वारीसाठी पंढरीकडे ज्या संतांच्या पालख्या घेऊन वारकरी जातात, त्यामध्ये आळंदीहून निघणारी ‘संत ज्ञानदेवांची पालखी’ आणि देहूहून निघणारी ‘संत तुकारामाची पालखी’ हे सोहळे सर्वात मोठे असतात. या पालखी सोहळ्यांमध्ये अनेक वारकरी दिंड्या एकत्रित भजन करीत पायी वाटचाल करतात. प्रत्येक रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पुढे प्रवचन, कीर्तन, हरीजागराचे नित्यनेमाने कार्यक्रम होतात. भजन, प्रवचन, कीर्तन याद्वारे संतवाणीतील बोध प्रतिपादन केला जातो व नामभक्तीचे अमृतसिंचन केले जाते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून, वेगवेगळ्या रस्त्यांनी, वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्काम करीत येणार्या या शेकडो पालख्या-दिंड्या म्हणजे एकप्रकारचे सांस्कृतिक लोकजागरणच आहे, यादृष्टीने पंढरीची वारी म्हणजे अवघा महाराष्ट्र भक्तिबोधाच्या अमृतवर्षावाने सुस्नात करणारी भक्ती प्रबोधयात्रा आहे.
पंढरीच्या वारीमधील आषाढ शुक्ल एकादशी हा दिवस मुख्य दिवस असतो. एकादशीच्या पहाटे श्री विठ्ठल देवतेची ब्रह्ममुहूर्तावर पहाटे ३ वाजता विशेष महापूजा संपन्न होते. सारे वारकरी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून वाळवंटातील भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन हरीनामाचा जयघोष करीत पंढरीक्षेत्राची नगर प्रदक्षिणा करतात. सर्व वारकरी फडांच्यावतीने एकादशी दिवशी दुपारी ‘नगर प्रदक्षिणा’ केली जाते. ‘चंद्रभागेचे स्नान’ आणि ‘नगर प्रदक्षिणा’ हे वारीत मुख्य विधी मानले जातात. त्यानंतर विठ्ठलदर्शन. वारकरी भक्तिपंथ हा नामधारकाचा पंथ असल्याने, या विशेष पर्वकाळी, प्रवचन, कीर्तनाद्वारे विठ्ठलाच्या गुणविशेषांचे श्रवण करणे याला विशेष महत्त्व आहे. ‘चंद्रभागे स्नान विधि तो हरिकथा।’ असे प्रवचन - कीर्तन म्हणजेच हरीकथेचे विशेष महात्म्य आहे.
विठ्ठलरथाची प्रदक्षिणा
एकादशीच्या एकाच दिवशी मंदिरात जाऊन लाखो वारकर्याचे ‘विठ्ठलदर्शन’ होणे शक्यच नसते. त्यामुळे एकादशीच्या मध्यान्ही विठ्ठलाची प्रदक्षिणामार्गावरून रथयात्रा काढली जाते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हजारो वारकरी रथातील विठ्ठलाचे दर्शन घेतात. रथावर फुले, खारीख उधळतात. या रथयात्रेत १२ बलुतेदार, विशेषतः वडार समाजाला विशेष मान आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. सामाजिक एकोपा, सौहार्द यांचे हे भक्तिदर्शन आहे.
एकादशीच्या दिवशी सारे वारकरी उपवास करतात. द्वादशीला विठ्ठलाला नैवेद्य दाखवून वारकरी प्रसादग्रहण करून एकादशीचा उपवास सोडतात. या दिवशी प्रत्येक फडावर भजन, प्रवचन, कीर्तनाचे कार्यक्रम झाल्यावर ‘क्षीरापतीचे अभंग’ म्हटले जातात आणि भाविक श्रोत्यांना क्षीरापतीचा प्रसाद वाटला जातो. ही क्षीरापत घेऊन आपल्या गुरूंना वंदन करून दुरूनच विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन करून ‘वारी पूर्ण झाली’, ‘विठ्ठलाने वारी पूर्ण करून घेतली’ अशा कृतार्थ मनाने बरेचसे भाविक भक्त पंढरीक्षेत्राचा निरोप घेतात. पण, पंढरीच्या वारीची खरी सांप्रदायिक परंपरेप्रमाणे सांगता, पौर्णिमेच्या दिवशी गोपाळकाल्यानेच होते. निष्ठावान वारकरी, व्रतस्थ वारकरी, हे पौर्णिमेपर्यंत पंढरपूरातच नामभक्तीचा आनंद लुटत मुक्काम करतात.
गोपाळकाल्याने सांगता
पौर्णिमेच्या दिनी पंढरपूरपासून दीड किमी दूर गोपाळपूरमधील गोपाळकृष्ण मंंदिरात प्रत्येक वारकरी फडाद्वारे गोपाळकाला कीर्तन होते आणि सारे वारकरी गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन वारीची यथासांग सांगता झाली, अशा धन्यतेच्या भारलेल्या मनाने, अश्रुपूर्ण नयनांनी विठ्ठलाचा, पंढरीक्षेत्राचा निरोप घेतात. ‘काला’ हे पंढरीवारीचे व वारकरी भक्तिपंथाचे खास वैशिष्ट्य आहे. विठ्ठल हा गोकुळीचा बाळकृष्ण आहे. श्रीकृष्णाने गोकुळात यमुनेच्या काठी सर्व गुराखी, गोपालांना घेऊन सर्वांच्या शिदोर्या एकत्र करून ‘काला’ केला होता व बंधुभावाचा, ऐक्याचा, सर्वजण मनुष्य म्हणून समान असल्याचा बोध या ‘काला’ करण्यातून दिला होता. तोच सामाजिक ऐक्याचा, बंधुभावाचा भाव वारकरी संप्रदायाने ‘गोपाळकाला’ या विधीने जपलेला आहे. म्हणूनच काल्याच्या सोहळ्याचे अनुपम वर्णन करून संत तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे ‘काला’। तो हा वैकुंठी दुर्लभ॥
पंढरीची वारी यात्रा नाही, इथे कोणी नवस बोलत नाही, नवस फेडायला येत नाही. ही वारी देव - भक्तांच्या जीवलग भेटीचा प्रेमसोहळा आहे. माहेरचा - आईच्या प्रेमाचा जसा कुणा सासुरवाशिणीला कंटाळा येत नाही, सदैव माहेरची ओढ मनी असते, तसेच वारकर्यांना पंढरीच्या वारीत आनंद मिळतो म्हणून त्यालाही वारीची ओढ असते. म्हणून वारकरी विठ्ठलाकडे एकच मागणी, विनवणी करतो, ती म्हणजे-
हेचि व्हावी माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास॥
पंढरीचा वारकरी।
वारी चुकू न दे हरी॥
श्री क्षेत्र पंढरी, चंद्रभागा आणि विठ्ठलाएवढेच पंढरीची वारी करणार्या वारकर्यांचे त्याच्या गावात महत्त्व आहे. ग्रामीण भागातील पंढरीला जाऊ न शकणारे भाविक वारी करून येणार्या वारकर्यांच्या विठ्ठल म्हणून पाया पडतात. हा पंढरी, विठ्ठलाविषयीची अपार श्रद्धाभाव जनमानसांत आहे. संत म्हणतात, ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी। त्याची पायधुळी लागो मज॥’ असे पंढरीच्या वारीचे महत्त्व आहे. पंढरीची आषाढी वारी महाराष्ट्र लोकजीवनाचे सांस्कृतिक-सामाजिक अभिसरण आहे. वारीची समाजशास्त्रीय फलश्रुती हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे वारीकडे केवळ एक धार्मिक गोष्ट म्हणून दुर्लक्ष करणे ही आत्मवंचना, करंटेपण ठरेल.
चैतन्याची आनंदयात्रा
‘विठ्ठला’वर संशोधन करावे, असे अनेक विदेशी अभ्यासकांना वाटते व ते पंढरपूरकडे आकर्षित होतात. अलीकडे संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या पायी पालखी सोहळ्यांमध्ये भाविक वारकर्यांसमवेतच आयटी क्षेत्रातील संगणकाश्रयी तरुणांची दिंडी पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. पंढरीची वारी ही चैतन्याची आनंदयात्रा आहे. या वारीच्या वाटेवर आधुनिक सुखसोयी नाहीत. पण, अनेक अभावातही जो शब्दातीत परमानंद तुम्हाला मिळतो, तो असीम आनंद हेच विठ्ठलाचे रुप आहे. तो परमानंद अनामिक आकर्षण निर्माण करतो, ओढ लावतो. आणि अशा अनाम ओढीमध्येच पंढरपूर वारीच्या शेकडो वर्षांच्या अखंड परंपरेतील सातत्याचे रहस्य दडलेले आहे. तुम्हीही केवळ वाचक न राहता, या अनाम सुखाचा आनंद घ्या. व्हा पंढरीच्या वारीत सामील. भक्त भाविकांचा हा जनसागर पाहून त्याची भक्ती, निष्ठा पाहून तुमच्याही मनातील श्रद्धेचा दीप प्रज्वलित होईल. तुम्ही देहभान हरपून जाल, अहंकार गळून पडेल. व्यष्टित्व लोप पावेल व तुम्ही समष्टिरुप व्हाल. या विराटभक्तिसागराचा एक बिंदू व्हाल आणि मग तुम्हाला सर्वत्र ‘माऊली माऊली’ दिसेल. विठुमाऊलीचे दर्शन घडेल. सर्व वारकर्यांच्या हृदयाहृदयांतील विठ्ठलभाव तुमच्याही हृदयात निर्माण होईल. अंतरंग प्रचिती येईल. ही खरी वारी होय.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल।
विद्याधर ताठे
(लेखक हे मूळ पंढरपूरचे सुपुत्र असून एकताचे माजी संपादक आहेत.)
९८८१९०९७७५