पटोलेंमुळे पक्षातील अनेक आमदार नाराज! काँग्रेस आमदाराचा आरोप

16 Jul 2024 18:17:08
 
Nana Patole
 
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे पक्षातील अनेक आमदार नाराज आहे, असा आरोप इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे. हिरामण खोसकर यांनी विधानपरिषद निवडणूकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला.
 
हिरामण खोसकर म्हणाले की, "विधानपरिषद निवडणूकीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत कुणाला मतदान करायचं याबाबत ठरलं. आम्हां ७ जणांना मिलिंद नार्वेकरांना मतदान करण्यास सांगण्यात आलं. तर ६ जणांना जयंत पाटलांना मतदान करण्यास सांगण्यात आलं. तसेच २५ आमदारांनी प्रज्ञा सातव यांना मतदान करायला सांगण्यात आलं. त्याच पद्धतीने आम्ही केले. आम्ही चुका केल्या नाहीत. त्यांना आमच्यावर विश्वास नसेल, तर न्यायालयाची परवानगी घेऊन झालेले मतदान तपासावे. माझी चूक झाली असेल, तर कारवाई करावी, पक्षातून हकालपट्टी करावी. परंतू, कारण नसताना महाराष्ट्रभर बदनामी सुरू आहे, ती थांबवावी," असे आवाहन त्यांनी केले.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला स्थगिती
 
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गेल्या पाच वर्षांत एकाही आमदाराला विचारले नाही. आमची कामे होतात, की नाही, याबाबत कधीच विचारपूस झाली नाही. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमची अपेक्षा आहे की, त्यांनी दोन महिन्यातून एखाद्या दिवशी तरी आमदारांशी चर्चा केली पाहिजे. परंतू, त्यांना कुणी भेटले की, ते केवळ चुका दाखवण्याचे काम करतात. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कधीही ते आमदारांशी प्रेमाने बोलले नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे काही आमदारांनी तक्रार केली आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0