नवी मुंबईत स्वतःचे मनपसंत घर साकारा

सिडकोतर्फे ४८ भूखंडासह २१८ दुकानांसाठी योजना

    16-Jul-2024
Total Views |
सिडको
 
नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये निवासी, बंगला, निवासी तथा वाणिज्यिक, वाणिज्यिक, सेवा उद्योग आणि स्टार हॉटेल वापराकरिता ४८ भूखंडांसह सिडकोच्या गृहनिर्माण संकुलांतील २१८ दुकानांच्या विक्रीची भव्य योजना सादर करण्यात आली आहे. भूखंड विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस ६ जुलै पासून सुरुवात झाली आहे. तर दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस १६ जुलै पासून सुरुवात होणार आहे.
 
सिडकोतर्फे नवी मुंबईच्या घणसोली, नेरूळ, सीबीडी बेलापूर,  खारघर, कोपरखैरणे, कळंबोली, पनवेल (पू.) आणि पनवेल (प.) नोडमधील निवासी, बंगला, निवासी तथा वाणिज्यिक, वाणिज्यिक, सेवा उद्योग आणि स्टार हॉटेल वापराकरिताचे ४८ भूखंड ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेकरिता https://eauction.cidcoindia.com/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेकरिता ऑनलाइन नोंदणीचा कालावधी ०८ जुलै ते २३ जुलै आहे. योजनेचा निकाल २५ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल.
 
तसेच सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलासह नवी मुंबईतील तळोजा, कळंबोली, घणसोली, खारघर आणि द्रोणागिरी नोडमधील गृहसंकुलांतील २१८ दुकाने ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस १६ जुलै पासून सुरुवात होणार आहे. योजनेचा निकाल २० ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोने दिली आहे. या योजनांतील भूखंड आणि दुकाने असणारी गृहसंकले नवी मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी व वेगाने विकसित होणाऱ्या नोडमध्ये आहेत.
 
योजनेतील भूखंड हे सर्व पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहेत. तसेच गृहसंकुलांचा परिसर हा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. महामार्ग, मेट्रो, रेल्वे यांद्वारे या भूखंडांना आणि गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच सिडकोचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी या महत्त्वाच्या ठिकाणांपासूनही हा परिसर नजीकच्या अंतरावर आहे. भूखंड विक्रीच्या योजनेद्वारे बांधकाम विकासकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या स्वप्नातील घर नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये साकारण्याची संधी मिळणार आहे.
 
या योजनेंतर्गत लहान, मध्यम व मोठ्या क्षेत्रफळांचे भूखंड उपलब्ध आहेत. तरी अधिकाधिक नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच सिडकोतर्फे नेहमीच शहरातील बांधकाम क्षेत्राला आणि वाणिज्यिक उपक्रमांना चालना देण्यासाठी भूखंड, दुकाने आणि वाणिज्यिक जागांच्या विक्रीच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे नवी मुंबईची अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होत आहे. या वेळच्या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईसारख्या शहरात स्वतःचे मनपसंत घर (बंगला) बांधण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.
-विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको