उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग

    15-Jul-2024
Total Views |
maharashtra congress assembly election


एव्हाना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी आपले बळ जोखायला सुरुवात केली आहे. मात्र, कितीही बेटकुळ्या फुगवल्या तरीही नाशिकमध्ये जागावाटपात काँग्रेसला भोपळ्याशिवाय एकही जागा मिळणार नाही. मित्रपक्ष हिंग लावूनही विचारणार नाही, हे माहीत असूनही विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने पक्षाकडे उमेदवारी मागणी करता अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. शहरातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि देवळाली या चारही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरून घेतले जाणार आहे. मुळात शहरातील काँग्रेसकडे बघितले तर कार्यकर्ते कोणाला म्हणायचे, हा प्रश्न पडतो. कारण, जिल्हा काँग्रेसमध्ये सगळाच सावळा गोंधळ असून स्वतःला ‘नेते’ म्हणवून घेण्यातच सगळे धन्यता मानत आहेत. सगळेच नेते झाल्याने पक्षवाढीसाठी काम करण्यासारखे क्षुल्लक काम कोण करणार, कारण सगळेच नेत्यांच्या आविर्भावात फिरत आहेत. शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी आतापर्यंत पक्षवाढीसाठी किती मेहनत घेतली, हे दुर्बीण लावून शोधावे लागते. ना कधी पक्षाची बैठक ना कधी एखादा किमान-समान कार्यक्रम. पद मिळाल्यापासून पक्ष वाढेल असे कोणतेच नजरेत भरणारे काम त्यांच्याकडून हाती घेण्यात आलेले नाही. सर्वच पदाधिकारी आपली पदे शोभेची असल्यासारखे मिरवत आहेत. शहरात नावालाच शिल्लक असलेल्या संघटनेत कोणाचाच पायपोस कोणाला उरलेला नाही. चुकून कधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी शहरात पायधूळ झाडलीच, तर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पक्ष कार्यालय असून संपूर्ण शुकशुकाट बघायला मिळतो. त्यामुळे आगामी विधानसभा कोणाच्या बळावर आणि का लढायच्या, याचा सारासार विचार न करता फक्त निवडणूक लढवून आपटी खाण्याचा सध्या काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी जिल्हा काँग्रेसने कितीही जोरबैठका काढल्या तरी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या उबाठा आणि शरद पवार गट जागा सोडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांच्या दारात कटोरा घेऊन उभे राहिले, तरी हे दोन्ही मित्रपक्ष शहरातील एकही जागा काँग्रेसला सोडणार नाही, हे सत्यच. ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशीच काहीशी परिस्थिती सध्या नाशिक काँग्रेसची झालेली दिसते.

इगतपुरीचे तीनतेरा

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या मतांमुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर मत फुटले की नाही, यामुळे चर्चेत आले. अनेक उचापतींनी खोसकर महाशय अधूनमधून नाशिकमध्ये चर्चेत असतातच म्हणा. छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय म्हणून खोसकर यांची ओळख. 2014च्या विधानसभा निवडणुकीत इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोसकरांनी दंड थोपटले. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 2019 साली पक्षबदल करत काँग्रेसची उमेदवारी मिळवली आणि आमदार म्हणूनही विधानसभेत दाखल झाले. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या मतदारांनी दोन अपवाद वगळता प्रत्येक वेळी काँग्रेसच्या पदरात मतांचे दान टाकले आहे. परंतु, प्रत्येक वेळी त्यांच्या नशिबी निराशाच पडली. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये पडतो. परंतु, कोणतीच पाणलोट योजना या भागात प्रभावीपणे राबविण्यात न आल्याने हिवाळ्याची चाहूल लागताच दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. नोव्हेंबरपासूनच येथील महिलांना पाचवीला पूजल्याप्रमाणे हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. संपूर्ण मतदारसंघात ठसठशीत वाटावी, अशी कोणतीच विकासकामे झाली नाही. खोसकर काय किंवा याआधीचे काँग्रेसचे आमदार काय, कोणाकडूनच विकासाच्या कोणत्याच पाऊलवाटा येथे न पोहोचल्याने विकास खुंटल्याचेच चित्र नजरेस पडते. विद्यमान आमदार खोसकर इगतपुरीचे प्रतिनिधित्व करत असले, तरी त्यांचा राबता मात्र कायम नाशिक शहरातच दिसतो. त्यामुळे आपले काम मार्गी लावण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांना 60 ते 70 किमीची तंगडतोड करत नाशिकच्या ठक्कर बाजार येथे थाटलेल्या कार्यालयात करावी लागते. यामुळेच आमदार हरवल्याचे फलकही या मतदारसंघात झळकले होते. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात सातत्याने काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र, मतदारांना कायम वार्‍यावर सोडले गेले. इथले रस्ते कायम माना टाकलेल्या अवस्थेत, तर विहिरींनी गाठलेला तळ अशी भयाण परिस्थिती. निसर्गाचे भरभरून लेणं लाभलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या समृद्ध भागाला काँग्रेस नावाचे ग्रहण लागल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

विराम गांगुर्डे