विशाळगड मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या शिवभक्तांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही!

15 Jul 2024 18:20:30
Nitesh Rane
 
मुंबई :"विशाळगड मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांबरोबर मी उभा आहे. एक ऐतिहासिक कार्य ते करीत आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ", असा विश्वास भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला रविवार, दि. १४ जुलैपर्यंत मुदत दिली होती.
 
त्यानंतरही अतिक्रमणांवर कारवाई न झाल्याने शिवभक्तांनी विशाळगडाकडे कूच केली. त्यानंतर अज्ञातांनी दगडफेक केल्याने या आंदोलनाला वेगळे वळण लागले. शाहुवाडी पोलिसांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यात आता नितेश राणे यांनी उडी घेतली असून, विशाळगड मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या एकाही शिवभक्ताच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
 
दहशतवादी यासिन भटकळ ६ महिने विशाळगडावर
विशाळगड मुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्या शिवभक्तांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली. यासिन भटकळ हा कुख्यात दहशतवादी विशाळगडावर ६ दिवस राहून गेल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. दरम्यान, इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य असलेला यासिन भटकळ हा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आहे. तसेच दिल्लीच्या बाजारपेठेतील साखळी बॉम्बस्फोटांचाही तो मास्टरमाइंड होता. मुंबई लोकल, बंगळुरू, जयपूर, वाराणसी, सुरत येथे झालेल्या बॉम्बस्फोटातीलही तो आरोपी आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0