मराठी संतसाहित्यामध्ये स्त्री संतांचे योगदान अनन्यसाधारण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये संत मुक्ताई, जनाबाई, सोयराबाई प्रमाणेच संत तुकारामशिष्या संत कवयित्री बहिणाबाई शिऊरकर यांचे स्थान गौरवास्पद आहे. संत कवयित्री बहिणाबाईंच्या नावावर सर्वाधिक ७०० पेक्षा अधिक अभंग असून त्यांची स्वतंत्र ‘अभंगगाथा’ सर्वपरिचित आहे. संत बहिणाबाईंचे अभंग स्वानुभव व साक्षात्कार प्रचितीचे अनिर्वचनीय शब्दरुप आहे. त्यांच्या अद्वैत समन्वयी दृष्टीने गुरू तुकोबा, विठोबा आणि श्रीराम एकच आहेत. श्रीरामाची परब्रह्म म्हणून बहिणाबाई स्तुती करतात. त्यांनी केलेल्या श्रीरामाच्या दोन आरत्या मराठी आरती साहित्यातील माणिकमोती आहेत.
रामा तू माझा जीवलग सांगाती।
संत तुकोबांची एकमेव स्त्री शिष्या म्हणून संत बहिणाबाई शिऊरकर यांचे जीवनचरित्र व साहित्य थक्क करणारे आहे. इ.स. १६२८ ते १७०० असा ७२ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ मानला जातो. त्याची स्वतंत्र ‘अभंगगाथा’ उपलब्ध असून त्यामध्ये ७१९ मराठी अभंग आणि २२ हिंदी पदे आहेत. संत बहिणाबाईंचे वयाच्या तिसर्या वर्षी ३० वर्षांच्या बीजवराशी लग्न झाले. वयाच्या ११व्या वर्षी त्यांना नवर्याबरोबर गाव सोडून वणवण करावी लागली. नवरा अत्यंत तापट, कर्मकांडी व कर्मठ होता. त्यामुळे छोट्या बहिणाबाईंना खूप सोसावे लागले. तुकोबांचे भक्तिपंथातील श्रेष्ठत्व व अभंगवाणीने बहिणा प्रभावित झाली व तिला तुकोबांचा ध्यास लागला. स्वप्नदृष्टांतांमध्ये तुकोबांचे दर्शन घडले व अनुग्रह प्राप्त झाला, त्यानंतर तिला तुकोबांच्या प्रत्यक्ष भेटीची आस लागली. बहिणाबाईंना सद्गुरू तुकोबांच्या साक्षात भेटीचे भाग्य लाभले. तसेच, इ.स. १६४६ ते १६४९ अशी तीन वर्षे बहिणाबाईंना देहूमध्ये आनंद ओवरीत राहाण्याचे भाग्यही लाभले. ‘तुकोबा केवळ पांडुरंग’ असा सद्गुरूंचे त्यांना अंतरंगदर्शन घडले, बोध झाला. तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर तब्बल ५० वर्षे त्या भक्तिप्रचार कार्य करीत होत्या. इ.स. १७०० मध्ये वयाच्या ७२व्या वर्षी संत बहिणाबाईंचे निर्वाण झाले. ‘तुकाराम भेटला धन्य जिणे माझे। कृतकृत्य झाले सहजची॥’ हे तिचे अभंग उद्गार तिच्या कृतार्थ जीवनाचे दर्शन आहेत. संत बहिणाबाई शिऊरकर यांच्या नावावर संत मुक्ताई, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा आणि संत जनाबाई यांच्यापेक्षा अधिक संख्येने अभंग आहेत. त्यामध्ये विविधता आणि विपुलता दोन्ही गुण आहेत. त्यांचे अभंग म्हणजे स्वानुभव व साक्षात्कार अनिर्वचनीय दिव्य शब्दरुप आहेत. त्यांना ‘जातिस्मर सिद्धी’ प्राप्त होती. त्यामुळे त्यांनी १२ पूर्वजन्मांचे व मृत्यूपूर्वी पाच दिवस आधीच आपल्या मृत्यूचे सूचन अभंगातून कथन केले होते.
श्रीरामाच्या दोन आरत्या
संत बहिणाबाईंच्या अभंगसाहित्यात ‘राम’ व ‘रामनाम’ याचा उल्लेख अनेक ठिकाणी झालेला आढळतो. पण, सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, बहिणाबाईंनी श्रीरामाच्या चक्क दोन स्वतंत्र आरत्या रचलेल्या आहेत.
आरती १)
आरती रामराजा। दशरथ आत्मजा।
जानकी वामभागी। जय लक्ष्मुण अग्रजा ॥धृ.॥
सन्मुख मारुती तो। पायी अखंड दृष्टी।
चामरे छत्रधारी। उभा भरत दृष्ठी॥१॥
शकुनी वेळ येती। देव तेहतीस कोटी ।
श्रीरामनाम शब्द। होय गर्जना मोठी॥२॥
अंबरी पुष्पवृष्टि। होय आनंद मोठा।
धन्य हा मृत्युलोक। उणे केले वैकुंठा॥३॥
ब्रह्मादि देव तिन्ही। सुख पाहती डोळा।
घोटीती लाळ तेही। ऐसी चुकलो वेळा॥४॥
सुस्वर शब्दनाद। गाये रामनाम नारद।
तुंबर नाचताती । देवा जाणविती भेद ॥५॥
तेहतीस देव कोटी। पुढे तिष्ठती उभे।
श्रीरामनाम शब्द। नाद दाटला नभी॥६॥
वाजती दिव्य वाद्ये। शंखभेरी अनेका।
बहेणि तिष्ठताहे। हाती घेऊनी पादुका॥७॥ (अ.क्र.५७०)
आरती २)
हनुमंत जांबुवंत पुढे उभे राहती।
जोडुनी पाणी दोन्ही रामस्तुती करिती।
श्रीराम शेजे पहुडले सीता मंचक सावरी।
उभी जनकबाळा आरती घेऊनी करी॥
कर्पूर उजळती रत्नदीप शोभती।
आणिक दीपावली सुगंधी लावती।
सुगंध बहु फार दशंग लाविला।
भरत शत्रुघ्न पुढे लक्ष्म उभा राहिला॥२॥
उधरण रंगी आणि द्राक्षफले बहुता प्रकारे।
रामापुढे ठविताती सकळिक पक्वान्ने सारे।
सीता देवी दे तांबूल त्रयोदशी गुणी।
उपचार किती वानू शिणली व्यासवाणी॥३॥
राघवे निद्रा केली आज्ञा सकळासी दिधली।
सीतादेवी चरणी स्थिरली। पाहुनी बहेणी आनंदली॥४॥ (अ.क्र.६४२)
या दोन आरत्यांपैकी दुसरी आरती ही ‘शेजारती’ आहे. ‘आरती वाङ्मय’ हा संतसाहित्यातील एक स्वतंत्र प्रकार आहे. अनेक संतांनी विविध देवता व देवस्वरुप गुरू आदींच्या स्तुतीपर आरत्या रचलेल्या आहेत. भक्ताने आर्तपणे केलेली इष्ट देवतेची स्तुती, विनवणी म्हणजे आरती.
जाले रामराज्य
श्रीरामाच्या ‘दोन आरत्या’ हे जसे बहिणाबाईंच्या साहित्यातील एक विशेष आहे. तसेच, त्यांच्या संत बहिणाबाई यांनी लिहिलेल्या दोन ‘सौरी’मध्ये श्रीरामाचा उल्लेख आढळतो. १) झाले रामराज्य तुमचे वोसरले बोल। धरा बाई लाज काही म्हणा राम राम॥ (अ.क्र.६२६) २) चाल माझ्या रामा, गाईन तुझ्या नामा। मने मुळी घेतली धाव म्हणवुनि नाचे प्रेमा॥ (अ.क्र.५६९) ‘सौरी’ ही काव्यरचना भारुडासारखी आहे. या ‘सौरी’ काव्यरचनेतील शब्दार्थापेक्षा भावार्थ व गूढार्थाला विशेष महत्त्व असते.
राम ः जिवलग सांगाती
श्रीरामावर संत बहिणाबाईंची पंढरीचा पांडुरंग व सद्गुरू तुकोबांएवढीच प्रगाढ श्रद्धा आहे. त्यांना राम-विठ्ठल-तुकोबा हे एकच वाटतात, एकरुप वाटतात. रामाला परब्रह्म म्हणून नाकारणार्यांना त्या ‘खळवादी दुष्ट’ म्हणतात व राम हा वेदाचा विवेक व उपनिषदांचे सार आहे, असे कथन करतात.
म्हणे राम ब्रह्मरुप नाही। तोचि खळवादी पाही॥१॥
नाम रुप दोन्ही एक। हाचि वेदाचा विवेक॥२॥
उपनिषदांचे सार। राम रुप निर्विकार॥३॥
रामा तू माझा जिवलग सांगाती। झणी मज अंती अंतरसी॥४॥
श्रीरामाला त्या ‘जीवलग’, ‘सांगाती’ म्हणतात. यातून त्यांची जवळीक, सख्यभाव दिसतो. वेद, उपनिषदानंतर बहिणाबाई पौराणिक कथांचाही आधार घेऊन रामनाममहात्म्य कथन करतात, असे दिसते. पौराणिक कथांमध्ये भगवान शिव पार्वतीला रामनाम घ्यायला सांगतात, असा दाखला बहिणाबाई देतात.
हाचि पुराणी विचार। शब्द नव्हे राम राम। पार्वतीला सांगे शिव।
विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
(पुढील अंकात ः संत तुकारामशिष्य निळोबा यांची रामनाम महती)