शरद पवारांच्या डावात जयंत पाटलांचा बळी!

13 Jul 2024 13:12:19
 
Jayant Patil
 
मुंबई : शरद पवारांनी डाव टाकला आणि शेकापच्या जयंत पाटलांचा त्यात बळी गेला, असा घणाघात भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणूकीत शरद पवारांनी जयंत पाटलांचा पाठिंबा दिला होता. परंतू, त्यांचा पराभव झाला. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधला.
 
सदाभाऊ खोत म्हणाले की, "जयंत पाटील हे शेकापचे वरिष्ठ नेते आहेत. पण जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. जयंत पाटलांसारख्या लढवय्या नेत्याचा तुम्ही का घात केला? याचं उत्तर शरद पवारांना आणि मविआला द्यावं लागेल."
 
हे वाचलंत का? -  "दोन वर्षांपासून काँग्रेसची ७ मतं..."; संजय राऊतांचा गंभीर आरोप
 
"शरद पवार हे मविआचे सर्वेसर्वा आहेत. सत्ता आणण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी त्यांची असते. पण राज्यातील शेकाप हा पक्ष संपवण्याचं काम त्यांनी केलं आहे. भाजप सोडताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात तर मग जयंत पाटलांच्या उमेदवारीसाठी त्यांनी तुमचं का ऐकलं नाही? त्यामुळे हा पवारांनी टाकलेला डाव होता आणि यात जयंत पाटलांचा बळी गेला," असे ते म्हणाले.
 
मविआ म्हणजे जळकं घर!
 
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, "एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजिदादांच्या नेतृत्वाखाली महायूती विकासाच्या दिशेने निघाली आहे. त्यांनी अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. अशा काळात आपल्याला विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून काम करावं लागेल असं काँग्रेसच्या आमदारांना वाटलं असावं. काँग्रेसने चिंतन करायला हवं. ही लोकशाही आहे आणि इथे गुप्त पद्धतीने मतदान होतं. त्यामुळे आपण कुणावर दबाव टाकू शकत नाही. आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे तुमची झुंडशाही कुठून आली? तुम्ही पक्ष चालवत आहात की, गुंडांच्या टोळ्या चालवता, हे स्पष्ट करणं गरजेचं आहे."
 
"ही महाविकास आघाडी नसून भकास आघाडी आहे. हे एक जळकं घर आहे. त्यामुळे या जळक्या घरात चांगली आणि सज्जन माणसं राहणार नाहीत, हे कालच्या निकालावरून स्पष्ट झालं. महाविकास आघाडीतील नेते सरंजामशाहीचे नेते आहेत. ते सगळे प्रस्थापित आणि वाड्यातील नेते आहेत. त्यांना गावगाड्याशी काहीही देणंघेणं नाही," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0