पंढरीच्या विठू चरणी माझे कोटी कोटी नमन...

13 Jul 2024 21:58:14

pmo pandharpur

मुंबई, दि.१३: प्रतिनिधी 
राज्यभरात सध्या आषाढी एकादशीनिमित्ताने विठूनामाचा गाजर सुरु आहे. अशातच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठू चरणी लिन होण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांना मराठीत शुभेच्छा देत उपस्थितांची मने जिंकली. तसेच, लवकरच पालखी मार्गाचे काम पूर्ण होऊन हे मार्ग वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर शनिवार दि.१३ रोजी ते पहिल्यांदा मुंबईत आले होते. या पहिल्याच दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकापर्ण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मराठी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले," एनडीए सरकारचा तीर्थक्षेत्र विकास करण्याचा निर्धार आहे. तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा, भेट देणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्या. आपण सगळे जाणतो की, आता पंढरपूर वारीत लाखो श्रद्धाळू भक्तिभावाने सामिल झाले आहे. या वारकऱ्यांना सुविधा मिळावी याची चिंता एनडीए सरकारने केली आहे. या भाविकांना सुविधा मिळाव्या म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग दोनशे किमी पूर्ण झाला आहे. तर संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग ११० किलोमीटर पूर्ण झाला आहे. लवकरच हे दोन्ही मार्ग वारकऱ्याच्या सेवेत दाखल होतील. सर्व वारकऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. पंढरीच्या विठू चरणी माझे कोटी कोटी नमन करतो', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांची मन जिंकली.
Powered By Sangraha 9.0