विशाळगडाला अनधिकृत मशीद बांधकामापासून मुक्ती द्या; आंदोलकांची मागणी

12 Jul 2024 15:00:51
Lodha
 
मुंबई :कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अनधिकृत पद्धतीने बांधण्यात येत असलेल्या मशीद बांधकामाविरोधात अनेक शिवप्रेमींनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलन स्थळी जाऊन सर्व आंदोलकांची तात्काळ भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा करुन, त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले.
 
विशाळगडावर होत असलेल्या या अनधिकृत मशीद बांधकामाविरोधात शिवप्रेमी नागरिक विविध मार्गांनी आपला विरोध दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर दुर्ग प्रेमी आणि शिव प्रेमी नागरिकांकडून धरणे आंदोलन करण्यात आले, यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन, आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना आश्वस्त केले.
 
यावेळी मंत्री लोढा म्हणाले, "विशाळगडाचे पावित्र्य जापण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आंदोलकांनी मला ऑर्डरची प्रत आणि निवेदन द्यावे, तुमच्या प्रतिनिधी मंडळासोबत ते निवेदन मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवतो." सामाजिक भान राखत विशाळगडावर होणाऱ्या अनधिकृत बांधकामाविरोधात उभे राहिलेल्या या नागरिकांच्या आंदोलनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी पाठिंबा दर्शवला.
Powered By Sangraha 9.0