ठाण्यात ‘स्वाईन फ्लू’चा कहर

12 Jul 2024 15:20:19

Swayin Flu
 
ठाणे : पावसाळा सुरू झाला की, साथीचे आजार बळावतात आणि या बळावलेल्या आजारात आता ‘स्वाईन फ्लू’ने कहर केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात जुलै महिन्यात ‘स्वाईन फ्लू’चे 79 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जानेवारी ते जुलै या कालावधीत ‘स्वाईन फ्लू’चे एकूण 124 रुग्ण आढळल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’साठी एक विलगीकरण कक्ष तयार केला आहे.
 
ठाण्यात पावसाने जोर पकडला असून साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. पावसामुळे जागोजागी पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होते व या कालावधीमध्ये डेंग्यू व मलेरियाचे प्रमाण वाढते. मात्र, जुलै महिन्यात डेंग्यूचे 13 तर मलेरियाचे 28 रुग्ण आढळले असून सर्व रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तर, जुलै महिन्यात आजपावेतो ‘स्वाईन फ्लू’चे 79 रुग्ण आढळले आहेत. यात नौपाडा क्षेत्रात 20, गांधीनगर भागात 12 आणि माजिवडा परिसरात 10 ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते जुलै या कालावधीत ‘स्वाईन फ्लू’चे एकूण 124 रुग्ण तर गतवर्षी एकूण 256 ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आजपावेतो ‘स्वाईन फ्लू’चा एकही रुग्ण दगावलेला नसल्याची पुस्ती आरोग्य अधिकार्‍यांनी जोडली.
‘स्वाईन फ्लू’बद्दल सतर्क राहा
ठाणे महापालिका क्षेत्रात, जूनपासून आजपर्यंत ‘स्वाईन फ्लू’च्या (एचवनएनवन) रुग्णांची संख्या 79 इतकी आहे. गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते परंतु, ‘स्वाईन फ्लू’च्या (एचथ्रीएनटू) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी. औषधांची उपलब्धता ठेवावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार केला असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0