मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सची झाली घोषणा

    11-Jul-2024
Total Views |
 
madhusudan kalelkar
 
 
 
मुंबई : नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्यनिर्माता, चित्रपटनिर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचं मनोरंजन सृष्टीतील योगदान अमूल्य आहे. कै.मधुसूदन कालेलकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र सिद्धहस्त लेखक अनिल कालेलकर यांनी वडिलांचा कलेचा वारसा पुढे चालवला. हाच वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी मधुसूदन कालेलकर यांची पुढची पिढी आता सज्ज झाली आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची घोषणा एका शानदार सोहळ्यात केली आहे. या प्रॉडक्शन्स हाऊसतर्फे आगामी काळात अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांच्या भेटीला येणार आहेत. गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी हे दांपत्य ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या प्रॉडक्शन्स हाऊसची धुरा सांभाळणार आहेत.
 
हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल याच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ तर्फे आगामी काळात चित्रपटांची निर्मिती, वेबसिरीज तसेच व्यावसायिक नाटकांची निर्मिती, गीत संगीताचे मनोरंजक कार्यक्रम केले जाणार असून या सगळ्यांची सविस्तर घोषणा लवकरच केली जाणार आहे.
 
मराठी-हिंदी चित्रपट लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ वेंगुर्ल्यात झाला. २०२३-२०२४ हे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या कारकिर्दीत ११० हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन मधुसूदन कालेलकरांनी केले. ७० पेक्षा जास्त चित्रपट गीते लिहिली. ३० पेक्षा जास्त नाटके लिहिली. पाच नाटकांची निर्मिती केली. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या ‘मधुसूदन कालेलकर’ यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या चौफेर कर्तृत्वाने कलेच्या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची पुढची पिढी सज्ज झाली आहे, ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.