“अशी बनवाबनवी चित्रपट लक्ष्याशिवाय अपुर्णच”, सिक्वेलच्या चर्चांवर सचिन यांचे भावूक उत्तर

    11-Jul-2024
Total Views |

ashi hi banavabanavi 
 
 
 
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या अनेक चित्रपटांच्या यादीत 'अशीही बनवाबनवी' हा चित्रपट नक्कीच येतो. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. त्यामुळे अशीही बनावाबनवीचा सिक्वेल येणार का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी अभिनेते सचिन पिळगांवकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सप्ष्टपणे उत्तर दिले आहे.
 
'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सिद्धार्थ रे या चौघांची प्रमुख भूमिका होती. यातील प्रत्येक संवादाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावलं होतं. विशेष म्हणजे आजच्या काळात त्या चित्रपटातील संवादांचे सुफान मीम्स देखील पाहायला मिळत आहेत. व्ही. शांताराम यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते.
 
'अशी ही बनवाबनवी'च्या सिक्वेलच्या चर्चांवर सचिन पिळगांवकर म्हणाले आहेत की, “हा चित्रपट लक्ष्याशिवाय बनू शकत नाही. फक्त लक्ष्या नव्हे तर सुशांतची भूमिका साकारलेला सिद्धार्थदेखील या जगात नाही आहे. सुधीर जोशी, वसंत सबनीस, अरुण पौडवाल, शांताराम नांदगावकर असे 'अशी ही बनवाबनवी'च्या टीममधील अनेक दिग्गद लोकं आज आपल्यात नाहीत. या चित्रपटासाठी सगळ्यांचं योगदान होतं. त्यामुळे ही मंडळीच नाहीत तर चित्रपट पुढे जाऊ शकत नाही”, असे भावूक उत्तर त्यांनी दिले.
 
सचिन यांनी पुढे म्हटले की, “काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. हा चित्रपट मी बनवलाय, असं मी म्हणूच शकत नाही. हा चित्रपट आम्ही एकत्र येऊन बनवला. आणि लोकांनी तो मोठा केला”.
'अशी ही बनवाबनवी या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, लीलाबाई काळभोर, विजू खोटे आदी कलाकारांच्या भूमिका होत्या.