वाघनखांवरील विरोधकांच्या आरोपांना मुनगंटीवारांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...

    11-Jul-2024
Total Views |
 
Sudhir Mungantivar
 
मुंबई : लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लवकरच राज्यात येणार आहेत. मात्र, या वाघनखांबाबत विरोधकांनी अनेक आरोप केले होते. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीसुद्धा ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा केला होता. या सगळ्या आरोपांवर आता मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
 
सभागृहात बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यात यावी असा पत्रव्यवहार आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या प्रमुखांशी केला. एक दिवस त्यांचं उत्तर आलं आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाने एक वर्षासाठी दर्शनासाठी देण्यास मान्यता दिली. त्यानंतर आम्ही पुन्हा प्रयत्न केला आणि तीन वर्ष ही वाघनखं आपल्याकडे राहतील असा निर्णय घेण्यात आला."
 
हे वाचलंत का? -  राज्यातील शेतकरी बांधवांना 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार' समर्पित : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
"येत्या १९ जुलैला ही वाघनखं साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. परंतू, हजारो इतिहासकार आणि संशोधकांपैकी फक्त एका इतिहासकाराने यावर प्रश्न उपस्थित केला, याचा मला आनंद आहे. वाघनखं आणण्यासाठी एकही रुपयांचं भाडं देण्यात आलं नाही. ही वाघनखं आणण्यासाठी कोणताही खर्च झाला नाही. एका दिवसाच्या अधिवेशनाच्या खर्चापेक्षाही कमी खर्च ही वाघनखं भारतात आणण्यासाठी झाला," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "वाघनखं ठेवण्यासाठी ७ कोटी रुपये खर्च केला गेला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण यात कोणतेही सत्य नाही. या वाघनखांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचं प्रदर्शन आपण करणार आहोत. त्यामुळे त्यांची डागडूजी आणि त्या म्युझियमच्या नुतनीकरणासाठी खर्च केला गेला. तसेच अशी अनेक वाघनखं असल्याचाही दावा करण्यात आला. परंतू, १८७५ मध्ये तयार केले गेलेले बॉक्स इतर कोणत्याही वाघनखांच्या संदर्भात नाहीत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत, असा दावा कुणीही इतर वाघनखांबाबत केलेला नाही," असेही त्यांनी यावेळी सांगितले.