पुरी रथयात्रेदरम्यान १५०० हून अधिक स्वयंसेवकांचे सेवाकार्य
11 Jul 2024 16:15:56
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS Sevakarya) १५०० हून अधिक स्वयंसेवक महाप्रभू जगन्नाथाच्या रथयात्रेतील सेवाकार्यात गुंतले होते. उत्कल बिपन्ना सहायता समितीच्या वतीने स्वयंसेवकांनी जगप्रसिद्ध पुरी रथयात्रेदरम्यान १० प्रकारच्या सेवा दिल्या. यात विशेषतः गर्दीतील जखमी आणि बेशुद्ध भाविकांना रुग्णालयात नेण्यासाठी स्वयंसेवकांनी रुग्णवाहिकांकरिता ५०० मीटरचा रुग्णवाहिका कॉरिडॉर तयार केला होता.
यावेळी प्रथमोपचारासाठी ८ डॉक्टर्स, २ फार्मासिस्ट, २ सहाय्यक, २ रुग्णवाहिका सेवेत ४० स्वयंसेवक, ९ विविध स्ट्रेचर सेवेत ३६ स्वयंसेवक, १० ठिकाणी पिण्याचे पाणी वाटपासाठी ६० स्वयंसेवक, ५ ठिकाणी पिण्याचे पाणी वाटपासाठी २० स्वयंसेवक, १४ मशीनद्वारे पाणी फवारणीसाठी ४२ स्वयंसेवक, रुग्णालयातील ३५० रुग्णांना मदत करण्यासाठी २५ स्वयंसेवक, १० स्वच्छता गटांद्वारे १५० स्वयंसेवक, भोजन वितरणासाठी ६० स्वयंसेवक आणि रुग्णवाहिका कॉरिडॉरसाठी १०५९ स्वयंसेवक कार्यतत्पर होते.
दि. ७ व ८ जुलै असे दोन दिवस स्वयंसेवक सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड सेवाकार्यात सहभागी झाले होते. २००५ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रशासनाच्या सहकार्याने सेवाकार्य करत आहेत. या १० प्रकारच्या सेवांपैकी ९ दिवसांच्या दीर्घ कालावधीसाठी प्रथमोपचार प्रदान केले जात आहेत. ६ जुलै रोजी सायंकाळी स्थानिक सरस्वती शिशु विद्या मंदिर, घोडा बाजार येथे संघाच्या अधिकाऱ्यांनी १० भागात सर्व स्वयंसेवकांना सेवेचे महत्त्व समजावून सांगितले. ७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता गुंडीचा मंदिराजवळ सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर रथयात्रेत ही सेवा देण्यात आली.