राज्यातील शेतकरी बांधवांना 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार' समर्पित : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    11-Jul-2024
Total Views |
 
Shinde
 
नवी दिल्ली : १५ व्या कृषी नेतृत्व समिती २०२४ आणि एग्रीकल्चर टुडे या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार' महाराष्ट्राला जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवार, १० जुलै रोजी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ.एम.जे.खान, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
 
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवल्याबद्दल महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार राज्यातील शेतकऱ्यांना समर्पित करतो. त्यांच्या घामामुळे आणि श्रमामुळे हा पुरस्कार एका शेतकरीपुत्राला स्वीकारण्याचे भाग्य मिळाले आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  वरळी हिट अँड रन प्रकरण : पीडित कुटुंबाला मुख्यमंत्र्यांकडून १० लाखांची मदत
 
"राज्याने २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. राज्य शासनाने बांबू लागवडीसाठी प्राधान्य दिले असून ७ लाखांची सबसिडी दिली आहे. पीएम किसान निधी दुप्पट करून प्रत्येक शेतकऱ्याला १२ हजार रुपये दिलेत. लातूर येथे देशातील पहिला मायक्रो मिलेट प्रकल्प उभारला जात आहे. एक रुपयात पीकविमा, १२३ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे १७ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपावरील वीज बिल माफ करून मोठा दिलासा दिला असून शेतकरी हितासाठी यापुढेही कटिबद्ध राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिली.