ध्रुव राठीच्या नादी लागून गांधी - ठाकरे फसले; EVM बद्दल अफवा पसरवणे महागात पडणार?

अवमानाची कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

    11-Jul-2024
Total Views |
 evm
 
 
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी, उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि यूट्यूबर ध्रुव राठी यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत या नेत्यांवर ईव्हीएमबाबत खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
याचिकेत म्हटले आहे की, या लोकांनी आपली 'छुपी उद्दिष्टे' साध्य करण्यासाठी ईव्हीएमबद्दल संभ्रम निर्माण केला आणि लोकांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने नागरिकांवर प्रभाव टाकला. मिडडे वृत्तपत्राने दि. १६ जून २०२४ रोजी एक बातमी प्रकाशित केली होती, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की ईव्हीएम मशीन ओटीपीद्वारे अनलॉक केले जाऊ शकते. देशाच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधकांनी त्याचा वापर केला.
 
दि. १६ जून रोजी मिड डे वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या या वृत्तात दावा करण्यात आला होता की, पोलिसांना त्यांच्या तपासात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मतदानादरम्यान ईव्हीएमशी जोडलेला फोन वापरत असल्याचे आढळून आले होते. या वृत्तात पोलिसांचा हवाला देत उमेदवाराचे नातेवाईक ओटीपीद्वारे ईव्हीएम अनलॉक करत असल्याचा, दावा करण्यात आला होता. पोलिसांनी त्याचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. मात्र, नंतर मिड-डेने या बातमीचे खंडन करत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले.
  
लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्याने आरोप केला आहे की ध्रुव राठी आणि इतर सतत खोट्या बातम्या पसरवून सर्वसामान्यांची दिशाभूल करतात, ही त्यांची सवय आहे. असे करणे नीलेश नवलखा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (२०२१) मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. या आदेशात माध्यमांना ‘मीडिया ट्रायल’चा अवलंब करू नये यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.
  
याचिकेनुसार, राहुल गांधी, ध्रुव राठी यांच्यासह सर्व आरोपींनी त्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, ज्यात न्यायालयाने म्हटले होते की, ज्या खटल्यांची सुनावणी सुरू आहे, त्याबाबत कोणतेही मत तयार करून चुकीची माहिती जनतेमध्ये पसरवण्याचे काम करणे हा न्यायालयाचा अवमान कायद्याच्या कलम २(सी) अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.
 
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने राहुल गांधी, उद्धव ठाकरे, ध्रुव राठी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर न्यायालयाचा अवमान कायदा १९७१ च्या कलम २(बी) आणि १२ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. याशिवाय, याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाला कलम १९२, १९३, १०७, ४०९, १२० अंतर्गत सार्वजनिक यंत्रणेचा गैरवापर केल्याबद्दल आणि खोटे पुरावे तयार केल्याबद्दल वरील व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना देण्याची विनंती केली आहे.
  
आपल्या याचिकेत याचिकाकर्त्याने सीबीआय, आयबी आणि ईडीसह एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून राहुल गांधी, ध्रुव राठी, उद्धव ठाकरे आणि इतरांच्या 'गुप्त हेतूं'ची चौकशी करता येईल.