दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पॅरा कमांडो मैदानात; कठुआत सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक

    11-Jul-2024
Total Views |
 IndianArmy
 
श्रीनगर : आपल्या पाच साथीदारांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी, कठुआ जिल्ह्यातील बिलवारच्या बडनोटामध्ये भारतीय सैन्याची शोध मोहीम सुरू आहे. गुरुवार, दि. ११ जुलै २०२४ जम्मू-काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन, पंजाबचे डीजीपी आणि लष्कर आणि गुप्तचर संस्थांचे उच्च अधिकारी बैठकीसाठी जिल्हा पोलिस लाइन कठुआ येथे पोहोचले आहेत. आपापसात समन्वय वाढवण्यासाठी यंत्रणांनी ही बैठक घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
दहशतवादी हल्ले थांबवणे आणि अमरनाथ यात्रेची सुरक्षा यावर आज कठुआमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर गृह आणि संरक्षण मंत्रालयाला अहवाल पाठवला जाईल. दुसरीकडे, पोलिसांनी ट्रॅक्टर चालकासह २३ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्जिकल ऑपरेशनसाठी लष्कराचे पॅरा कमांडो जंगलात तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे.
 
याआधी बुधवारी वेस्टर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल मनोज कुमार खट्यार यांनीही मच्छेडी येथे पोहोचून घटनास्थळ आणि ऑपरेशनचा आढावा घेतला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी बुधवारी तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. खराब हवामान आणि भौगोलिक आव्हाने असूनही, सुरक्षा दल दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
  
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कठुआसह उधमपूर आणि डोडा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलांचाही शोध घेण्यात येत आहे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सतत लक्ष ठेवून आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हल्ल्याच्या वेळी लष्करी ताफ्याच्या पुढे जात असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली चालकाचीही चौकशी करण्यात आली.